गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांचा मोठा निर्णय ! PSI परीक्षेमध्ये पात्र असणाऱ्या 737 उमेदवारांना प्रशिक्षणास पाठवणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) २०१७ आणि २०१८ या वर्षी घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी राज्य शासनाकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. २०१७ आणि २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या पीएसआय परीक्षेमध्ये पात्र असणाऱ्या ७३७ उमेदवारांना जून २०२१ पासून मूलभूत प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील जारी केला आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत बोलताना म्हणाले, पोलीस उपनिरीक्षक (PSI) प्रशिक्षण हे कोरोना परिस्थितीच्या अधिन राहून तसेच राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या कोरोना मार्गदर्शक नियमांच्या अधिन राहून सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे निवड झालेल्या उमेदवारांना एक मोठा दिलासा मिळणार आहे.

७३७ उमेदवारांना दिलासा –
MPSC तर्फे २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या PSI भरतीमधील निवड झालेल्या आणि २०१७ मध्ये खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक (PSI) मर्यादित विभागीय परीक्षा मधील एकूण ७३७ उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवलं जाणार आहे. या उमेदवारांचं प्रशिक्षण जून (२०२१) महिन्यापासून प्रारंभ होणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

SRPF जवानांना देखील महत्वाचा दिलासा, बदलीची १५ वर्षाची अट रद्द –
राज्य राखीव पोलीस दलातील जवानांच्या (SRPF) जिल्हा पोलीस दलातील बदलीकरता आवश्यक सेवेची अट १५ वर्षांवरून १२ वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर जिल्हा पोलीस दलातील बदलीनंतर जिल्हा पोलीस मुख्यालयातील कर्तव्य कालावधी ५ वर्षांवरून २ वर्षांवर करण्याचा निर्णय घेतला आहे. SRPF जवानांसाठी घेतलेल्या या दिलासादायक निर्णयाबद्दल आदित्य ठाकरे यांनी गृहमंत्र्यांचे आभार मानले आहेत.