खडीच्या माध्यमातून साकारला ‘महाराष्ट्रा’चा नकाशा

पुणे: पोलीसनामा आॅनलाइन

एरंडवणा कर्वेनगर येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानातील मुख्य माळी दिलीप शेटे यांनी उद्यानात खडीच्या माध्यातून महाराष्ट्राचा नकाशा साकारला आहे. त्यांचा कलाविष्कार उद्यानातील मुख्य आकर्षण ठरला.

विविध प्रसंगांच्या निमित्ताने सुसंगत असे कलाविष्कार शेटे नेहमीच साकारत असतात. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने त्यांनी आज उद्यानात महाराष्ट्राचा नकाशा साकारला. याकरिता महापालिकेच्या उद्यान खात्याने त्यांना रंगीत खडी उपलब्ध करून दिली. त्या खडीच्या सहाय्याने त्यांनी तीन ते साडेतीन तासात महाराष्ट्राचा नकाशा साकारला. उद्यान आणि उद्यानातील वस्तुंची, झाडाझुडुपांची कलात्मक रचना, मांडणी हे ते आवडीने एक छंद म्हणून जोपासत असतात. त्यांच्या अशा उपक्रमांमुळे हे उद्यान लोकांच्या आकर्षणाचा भाग ठरलेले आहे. वारजे-कर्वेनगर प्रभाग समितीचे अध्यक्ष दीपक पोटे यांनी दिलीप शेटे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.