१०वी साठी पुन्हा ८० : २० गुणांचा पॅटर्न ?, तज्ज्ञ समितीची ‘शिफारस’, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दहावीच्या परीक्षेतील ८० – २० गुणांचा पॅटर्न रद्द केल्यामुळे राज्य सरकारच्या धोरणावर चांगलीच टीका करण्यात आली होती. परंतु आता भाषा आणि सामाजिक शास्त्रे विषयांची रद्द केलेली तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा पुन्हा सुरू करण्याची शिफारस तज्ज्ञांच्या समितीने केली आहे. दहावी बोर्डाच्या अंतर्गत मूल्यमापन व विषय रचनेवर पुर्नविचार करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली २९ सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने याविषयीचा अहवाल शिक्षण विभागाकडे सोपविला आहे. या आठवड्यात दहावीच्या मूल्यमापन पद्धतीवर निर्णय होण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांची खरी गुणवत्ता समोर यावी यासाठी तोंडी परीक्षेचे २० गुण बोर्डाने रद्द केले. या निर्णयामुळे दहावीचा निकाल १२ टक्यांनी घसरला. निकाल घसरल्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. या नवीन मूल्यमापन पद्धतीचा फटका विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशात देखील बसला. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांच्या असंतोषात अजूनच भर पडली. अखेर राज्य सरकारने या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी तज्ज्ञ समितीची नेमणूक केली. या समितीने तोंडी परीक्षा पुन्हा सुरु करण्याची शिफारस केली आहे.

लेखी परीक्षेत ८० पैकी १६ गुण अनिवार्य

तज्ज्ञ समितीने तोंडी परीक्षा पुन्हा सुरु करण्याची शिफारस केली आहे. या बरोबरच ८० लेखी गुणांपैकी १६ गुण मिळविणे अनिवार्य केले आहे. अशी शिफारस समितीने केली आहे. समितीच्या अहवालानंतर तोंडी परीक्षेविषयीचा निर्णय लवकर घेणे अपेक्षित आहे. या समितीत पाठ्यपुस्तके निर्मितीतील एकही सदस्य नाही.

आरोग्यविषयक वृत्त