महाराष्ट्राचे सुपुत्र कौस्तुभ राणे यांना काश्मीरमध्ये वीरमरण…

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन

ठाणे जिल्ह्यातील मीरारोडचे रहिवाशी असलेले कौस्तुभ राणे (२८) यांना काश्मीर मध्ये दहशतवाद्यांशी लढत असताना वीरमरण आले. उत्तर काश्मिरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत राणे शहिद झाले.

राणे यांच्या पश्चात आई-वडील, बहीण, पत्नी आणि अडीच वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. मीरा रोडच्या शीतल नगर येथील हिरल सागर इमारतीत राणे कुटुंब राहत आहे. ते मूळचे कोकणातल्या वैभववाडीचे आहेत. पण सुमारे 30 वर्षांपासून मीरारोड परिसरात राहतात.

घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांशी सोमवारी रात्रीपासूनच भारतीय जवानांचा लढा सुरु होता. मेजर राणेंसह तीन जवान आज सकाळी शहीद झाल्याचं सैन्याकडून सांगण्यात आलं. मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्याचं वृत्त समजताच कुटुंबासह राज्यावर शोककळा पसरली आहे.

कौस्तुभ राणे यांचे हॉली क्रॉस शाळेत त्यांनी आपलं शिक्षण घेतलं होतं. कौस्तुभ यांचे वडील टाटा कंपनीत तर आई ज्योती या बोरिवलीच्या गोखले शैक्षणिक संस्थेत होत्या, सध्या दोघेही निवृत्त आहेत. यंदा कौस्तुभ यांना सेना पदकाने सन्मानित करण्यात आले होते.