भारताच्या नोटांनंतर आता इंग्लंडच्या नाण्यांवर दिसणार महात्मा गांधी ? खुद्द ब्रिटिश अर्थमंत्र्यांनी केली ‘शिफारस’

लंडन : वृत्तसंस्था – भारताच्या प्रत्येक चलनी नोटांवर महात्मा गांधी यांचा फोटो छापण्यात येतो. आता भारतीय नोटांप्रमाणेच इंग्लंडमधील नाण्यांवरही महात्मा गांधी यांचा फोटो दिसणार आहे. अर्थमंत्री ऋषी सुनक यांच्या कार्यालयाने शनिवारी यासंदर्भात माहिती दिली. कार्यालयाने म्हटले आहे, की कृष्ण वर्णीय व्यक्ती, महात्मा गांधी भारतीय वंशाचे ब्रिटिश हेर नूर इनायत खान आणि जमैकन ब्रिटिश नर्स मैरी सीकोल यांच्या योगदान प्रित्यार्थ, त्यांचे छायाचित्र असलेली नाणी जारी करण्यात येतील.

इंग्लंडचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी यासंदर्भात रॉयल मिंट अ‍ॅडव्हाजरी कमिटीला (RMAC) एक पत्र लिहिले आहे. यात या समुदायांशी संबंधित लोकांच्या योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात यावे, असे सांगण्यात आले आहे. ब्रिटनच्या ट्रेझरीच्या वतीने जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात RMAC महात्मा गांधींचे चित्र असलेले एक नाणे जारी करण्यासंदर्भात विचार करत आहे.

ब्रिटिश नाण्यावर महात्मा गांधी यांच्या छायाचित्रासंदर्भात ऑक्टोबर 2019 मध्ये माजी मंत्री साजिद जाविद यांनी सर्वप्रथम विचार मांडला होता. सुनक यांनी हे पत्र ‘वुई टु बील्ट ब्रिटेन’ (आम्ही ब्रिटन घडवला) कॅम्पेनच्या समर्थनार्थ लिहले आहे. ज्यात ब्रिटिश चलनावर कृष्णवर्णीय व्यक्तींना प्रतिनिधित्व देण्याची मागणी केली जात आहे. कॅम्पेनचे नेतृत्व करणाऱ्या जेहरा जाहिदी यांना लिहीलेल्या या पत्रात म्हटले आहे की, कृष्णवर्णीय, आशियन आणि इतर अल्पसंख्याक समाजाने युनायटेड किंगडमच्या इतिहासात मोठे योगदान दिले आहे.

सुनक यांनी पुढे लिहिले, की, मी आज रॉयल मिट अ‍ॅडव्हायजरी कमिटीच्या प्रमुखांना लिहित आहे आणि त्यांना यावर विचार करावा असे आवाहन करत आहे. सुनक यांच्या कार्यालयाने पुष्टी केली आहे, की कमिटी सध्या महात्मा गांधींवर नाणे आणण्याचा विचार करत आहे.