पुणे मतदारसंघातून आसगावकर शिक्षकांचे आमदार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे शिक्षक मतदारसंघावर महाविकास आघाडीने झेंडा फडकवला आहे. काँग्रेसचे जयंत आसगावकर यांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत जयंत आसगावकर यांना १९ हजार ४२६ मते मिळाली आहेत, तर विद्यमान आमदार दत्तात्रेय सावंत यांना १२ हजार ६०३ मते मिळाली आहे. आसगावर यांनी ६ हजार ८२३ मतांची आघाडी घेत ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

तत्पूर्वी, अंतिम निकाल येण्यापूर्वीच महाविकास आघाडीच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत घोषणाबाजी सुरु केली होती. आसगावकर यांना विजयासाठी पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे ३० फेऱ्यांमध्ये मतमोजणी करावी लागली. शुक्रवारी दुपारी ३० व्या फेरी पर्यंत आसगावकर यांनी आघाडी टिकवून ठेवली. आता अंतिम निकाल समोर आले आहेत. जयंत आसगावकर यांच्या विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर लांबणीवर पडलेल्या पुणे विधानपरिषदेच्या शिक्षण मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण ३५ उमेदवार रिंगणात होते. त्यात महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर, भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार, विद्यमान आमदार व अपक्ष उमेदवार दत्तात्रेय सावंत यांच्यात प्रमुख लढत होती. मात्र, भाजप पुरस्कृत उमेदवार पवार यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार सावंत यांनीच चांगली लढत दिली.

विजयी उमेदवार जयंत आसगावकर म्हणाले, माझ्या विजयात महाविकास आघाडीचे समर्थक, शिक्षक,संस्था,संघटना यांचा मोलाचा वाटा आहे. या सर्वानी माझ्यावर विश्वास दाखवून मतदान केले. रयत शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद संस्था, पुणे जिल्हा शिक्षक मंडळ या संस्थांनी त्यांचे बहुमोल मत माझ्या पारड्यात टाकले, असेही त्यांनी सांगितलं.

एकुण मतदान – ७२५४५

झालेले मतदान – ५२९८७

वैध मतदान – ५०२२६

अवैध मतदान – २७७४

विजयासाठीचा कोटा – २५११४

उमेदवारांना पडलेली मते

जयंत आसगावकर – १९४२६

दत्तात्रेय सावंत – १२६०३

जितेंद्र पवार – ६६०७

गोरखनाथ थोरात – ५१८०