‘लेटरबॉम्ब’नंतर काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल, गुलाम नबी आझाद यांच्याकडील महासचिव पद काढलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शुक्रवारी कॉंग्रेसमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल झाला. गुलाम नबी आझाद यांच्याकडून महासचिव पद काढून घेण्यात आले आहे. ते हरियाणा राज्याचे प्रभारी होते. या फेरबदलाचा सर्वात मोठा फायदा राहुल गांधींचे निष्ठावंत रणदीप सिंह सुरजेवाला यांना झाला आहे. कॉंग्रेस अध्यक्षांना सल्ला देण्यासाठी आता सुरजेवाला सहा सदस्यांच्या विशेष समितीचा भाग असतील.

या सोबतच सुरजेवाला यांना काँग्रेसचे महासचिव देखील करण्यात आले आहे. त्यांना कर्नाटकचे प्रभारी करण्यात आले आहे. मधुसूदन मिस्त्री यांना केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष केले गेले आहे. प्रियंका गांधी यांना यूपीचे प्रभारी करण्यात आले आहे. याशिवाय केसी वेणुगोपाल यांना संघटनेची जबाबदारी देण्यात आली आहे.

तसेच मिळालेल्या माहितीनुसार, कॉंग्रेस महासचिवांमध्ये मुकुल वासनिक यांना मध्य प्रदेशची, हरीश रावत यांना पंजाबची, ओमान चांडी यांना आंध्र प्रदेशची, तारिक अन्वर यांना केरळ आणि लक्षद्वीपची, जितेंद्र सिंह यांना आसामची, अजय माकन यांना राजस्थानची जबाबदारी देण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त काँग्रेसने जितिन प्रसाद यांना पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार बेटांचे प्रभारी बनवले आहे. ही त्यांच्यासाठी संघटनेतील एक मोठी झेप मानली गेली आहे. जितिन प्रसाद हे वादग्रस्त पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या नेत्यांपैकी एक होते. ताज्या बदलावानंतर पवन कुमार बन्सल हे प्रभारी प्रशासन सचिव असतील. याशिवाय राहुल यांचे निष्ठावंत मनकीम टागोर यांची तेलंगणाच्या प्रभारी सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.