लोकसभेत पराभव होऊनही मल्लिकार्जुन खर्गे यांना राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेपद; जाणून घ्या त्यामागचं कारण…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील सदस्यत्वाचा कार्यकाल पूर्ण होत आहे. त्यानुसार, त्यांच्याकडे असलेल्या विरोधी पक्षनेते पदावर कोण याचीच चर्चा काँग्रेसमध्ये होती. मात्र, काँग्रेसने आझाद यांच्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड केली आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस वेणूगोपाल यांनी सांगितले, की काँग्रेसने राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांना काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदी मल्लिकार्जुन खर्गे यांची निवड केल्याची माहिती दिली आहे. या पदासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्ष उपनेते आनंद शर्मा हेदेखील उत्सुक होते. पण काँग्रेस पक्ष संघटनेवर अनेक सवाल उपस्थित करत सोनिया गांधी यांना पत्र लिहिल्यानंतर पक्ष नेतृत्वाकडून त्यांच्या नावाला पाठिंबा दिला जात नव्हता. त्यामुळे त्यांचे नाव मागे पडले होते.

2019 लोकसभा निवडणुकीत पराभव होऊनही विरोधी पक्षनेतेपद
मल्लिकार्जुन खर्गे यांनी 2019 मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. खर्गे यांचा पराभव होऊनही पक्षाने त्यांना राज्यसभेत पाठविले. त्याचं कारण म्हणजे मल्लिकार्जुन खर्गे हे राहुल गांधी यांचे अत्यंत जवळचे असल्याचे मानले जाते. त्यातूनच ही निवड झाल्याची चर्चा आहे.

15 फेब्रुवारीला होणार कार्यकाल पूर्ण
गुलाम नबी आझाद यांचा 15 फेब्रुवारीला राज्यसभेच्या सदस्यत्वाचा कार्यकाल पूर्ण होत आहे. त्यापूर्वीच आता विरोधी पक्षनेते पदावर कोण असेल याची घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे.