देशाला 4 राजधान्या हव्यात, ममता बॅनर्जींची अनोखी मागणी

कोलकाता : पोलीसनामा ऑनलाईन –  देशातील सर्व घडामोडीचे केंद्र केवळ एकच राजधानी दिल्ली का? असा सवाल उपस्थित करत देशाला किमान चार राजधान्या हव्यात, अशी आगळीवेगळी मागणी टीएमसीच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त कोलकातामधील श्याम बाजार येथे एका रॅलीचे आयोजन केले होते. त्यानंतर जनतेला संबोधित करताना बॅनर्जी म्हणाल्या की, भारतात किमान चार रोटेटिंग राजधान्या असायला हव्यात. इंग्रजांनी कोलकाता येथे बसून संपूर्ण देशावर राज्य केले. देशात एकच राजधानी दिल्ली का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

नवीन पीढीला नेताजींबाबत अधिक माहिती नाही. नेताजींच्या मृत्यूचे गूढ उकलले गेले पाहिजे. नेताजी आमच्यासाठी देशनायक आहेत. निवडणुका जवळ आल्यानंतर भाजपला पश्चिम बंगालची आठवण झाली, असा आरोपही त्यांनी केला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना केली. त्यावेळी त्यात गुजरात, बंगाल, तामिळनाडू या भागातील लोकांनीही सहभाग घेतला. फोडा आणि राज्य करा यास नेताजी नेहमी विरोध करायचे, असे त्या म्हणाल्या. बंगालच्या भावना बाहेरील व्यक्ती समजून घेऊ शकत नाही, असे सांगत भाजप इतिहास बदलण्याचा विचार करत आहे. पण नेता तोच असतो, जो सर्वांना सोबत घेऊन जातो, असे मत बॅनर्जी यांनी यावेळी व्यक्त केले.