अभिनेत्री मानसी नाईकनं जाहीर केली विवाहाची तारीख, ‘या’ बॉक्सर बरोबर करणार लग्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे ओळखली जाणारी मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईकने  तिच्या लग्नाची तारीखही जाहीर केली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने तसे वृत्त दिले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून मानसीच्या रिलेशनशीपविषयी चर्चा रंगत होती. पण नोव्हेंबर महिन्यात मानसीने तिचा प्रदीप खरेरा सोबत साखरपुडा झाल्याचे जाहीर करुन आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. प्रदीप खरेरा व्यावसायिक बॉक्सर आहे.

दरम्यान  नव्या वर्षात १९ जानेवारी २०२१ रोजी मानसी आणि प्रदीप विवाहबद्ध होणार आहेत. मानसीने सांगितले की, पुण्यात १९ जानेवारीला प्रदीप खरेरासोबत मी विवाहबंधनात अडकणार आहे. १८ जानेवारीला मेहेंदी आणि संगीत सोहळा होईल. लग्नाच्याच दिवशी १९ जानेवारीलाच  हळदीचा कार्यक्रम होईल” असे तिने सांगितले.

दोन्ही कुटुंबांनी परस्परसहमतीने छोटा आणि आनंददायी विवाहसोहळा करण्याचे ठरवले आहे त्यामुळे आम्ही खूप जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला लग्नासाठी आमंत्रित केले आहे. असे मानसीने सांगितले. मानसी नाईक आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे ओळखली जाते. तिची ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ ही गाणी तुफान गाजली. त्यामुळे मानसी नाईक हे नाव घराघरात पोहोचलं आहे.