मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे गुढ आणखी वाढले, चेहऱ्यावर, पाठीवर जखमा असल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानींच्या दक्षिण मुंबईतील घराबाहेर स्फोटक सापडलेल्या स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. कारण हिरेन यांच्या चेहऱ्याजवळ, डोळ्यावर आणि पाठीवर जखमा असल्याची बाब शवविच्छेदन अहवालात उघड झाली आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे गूढ आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हिरेन यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात करण्यात आले. चार डॉक्टरांच्या टीमने मिळून हे पोस्टमार्टम केले आहे शवविच्छेदन अहवालातील माहितीनुसार, मनसुख हिरेन यांच्या डोळ्याजवळ, चेह-यावर आणि पाठीवर दोन ठिकाणी जखमा होत्या. जर हिरेन यांनी आत्महत्या केली असती तर एकाच बाजूला जखमा होणे अपेक्षित होते. मात्र दोन्ही बाजूला झालेल्या जखमांमुळे संशयाचे गूढ वाढले आहे. पोलिसांनी याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र पीएम रिपोर्टमध्ये याबाबतचा उल्लेख आहे. हिरेन यांच्या शरीरावरील या जखमा एक सेंटिमीटरच्या आहेत. त्यांचा मृतदेह 8 ते 10 तास पाण्यात पडून होता. त्यामुळे पाण्यातील काही जीवांमुळे या जखमा झाल्यात का याचा खुलासा होणे बाकी आहे. या जखमा नेमक्या कधी झाल्यात हे यात नमूद होणे आवश्यक होते. मात्र त्यात हे नमूद केले नाही.