सचिन वाझेने ATS ला दिलेला जबाब खोटा; हिरेन यांची हत्या व्होल्वो कारमध्येच?

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. या कटात वापरलेले सिम कार्ड गुजरातमधील एका कंपनीच्या नावावर खरेदी केल्याचे समोर आले आहे. याशिवाय एटीएसने दीव दमन येथून व्होल्वो कार जप्त केली. या चार मध्येच हिरेन यांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या कारची फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून तपासणी सुरू आहे. तपासात धक्कादायक माहिती समोर आली ती म्हणजे एटीएसला सचिन वाझेने दिलेला जबाब खोटा असल्याचे एटीएसचे प्रमुख जयजित सिंह यांनी मंगळवारी दिली.

मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळल्यानंतर मनसुख यांची पत्नी विमला हिरेन यांनी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर विमला हिरेन यांनी दिलेल्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा नोंदवत एटीएसने तपास सुरू केला. विमला यांनी सचिन वाझेंवर संशय व्यक्त केल्याने ८ मार्च रोजी वाझेचा जबाब नोंदविला. यावेळी वाझेंनी विमला हिरेन यांनी केलेलं सर्व आरोप फेटाळून लावले. त्याचबरोबर मनसुख यांना आपण ओळखत नसल्याचे सांगत स्कॉर्पिओ वापरली नसल्याचे जबाबात सांगितले होते. मात्र हि सर्व माहिती खोटी असल्याचे तपासात समोर आल्याचे सिंह यांनी सांगितले. तपासात बुकी नरेश गोर याने वाझेच्या सांगण्यावरून विनायक शिंदेला सिमकार्ड पुरवले. गुजरातमधील एका व्यक्तीकडून गोर याने एकूण १४ सिमकार्डे मिळविली. त्यातील काही सिमकार्ड सुरु करून शिंदेने अन्य साथीदारांना दिली. शिंदेने याच सिमकार्डचा वापर करून मनसुख यांना घटनास्थळी बोलावून घेतले होते; तर काही सिमकार्ड आणि फोन त्यांनी नष्ट केल्याची माहिती समोर आली. या कटात दोघांचा समावेश असल्याचे स्पष्ट होताच त्यांना २१ मार्च रोजी अटक करण्यात आली. गुजरातमधील एका कंपनीच्या नावावर हे सिमकार्ड खरेदी केल्याचेही समोर आले.

घटनास्थळी नेऊन गुन्हा कसा घडला याचे केले प्रात्यक्षिक
एटीएसने सिम कार्ड पुरविणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेऊन मंगळवारी मुंबईत आणले. या गुन्ह्यात एक व्होल्वो कारचा वापर झाल्याचे संशय आल्याने ती कारही दीव दमण येथून जप्त केली. शिवाय कलिना येथील फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने कारची तपासणी सुरू आहे. हत्येच्या कटात विनायकचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचेही एटीएसने सांगितले. शिंदेला घटनास्थळी नेऊन त्यांनी गुन्हा कसा केला याचे प्रात्यक्षिकही घेण्यात आले. तसेच त्याचे घर, कार्यालय, गोडावूनमध्ये झाडाझडती घेण्यात आली.

हिरेन यांची हत्या व्होल्वो गाडीतच केल्याचा संशय, विनायक करायचा हफ्ता वसुली
४ मार्च रोजी सचिन वाझेने काही कामानिमित्त एटीएस पथकाने जप्त केलेली व्होल्वो कार ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मनसुख यांची हत्या याच वाहनात केल्याचा संशय एटीएसला आहे. त्या दिशेने अधिक तपास सुरू आहे. दमण येथील अभिषेक अग्रवाल यांची हि व्होल्वो कार आहे. त्यांचा सायकल विक्रीचा व्यवसाय आहे. याच व्यवसायात वाझेही भागीदार होता. ४ मार्च रोजी ही गाडी वाझेने कामानिमित्त घेतली होती, अशीही माहिती मिळाली आहे. तर विनायक शिंदेने ४ मार्च रोजी बनावट सिमकार्डद्वारे तावडे नावाने मनसुख यांना कॉल करून बोलावून घेतले. पुढे, याच वाहनात मनसुख यांची हत्या केल्याचा संशय एटीएसला आहे.

पॅरोलवर बाहेर आल्यानंतर सुरू होती हफ्ता वसुली
विनायक शिंदेला २००७ मध्ये वर्सोवा येथे झालेल्या लख्खन भैया एन्काऊंटर प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली. त्याला या प्रकरणात निलंबित करण्यात आले होते. लॉकडाऊनमुळे अनेक कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले होते. त्यामध्ये शिंदेला मे २०२० मध्ये सोडण्यात आले. पॅरोलवर बाहेर आल्यानंतर त्याने वाझेच्या बेकायदा कामात सहकार्य करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे त्याच्याकडे असलेल्या पोलीस ओळखपत्राच्या आधारे त्याने मुंबईसह ठाण्यातील पब, हुक्का पार्लर, बार मालकाकडून हफ्ते वसूल केल्याची धक्कादायक माहिती एटीएसच्या हाती लागली आहे.