कौतुकास्पद ! संस्कृतच्या क्षेत्रात करिअर बनवू इच्छितात मेरठच्या मुस्लिम मुली

मेरठ : वृत्तसंस्था – संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी योगी सरकारने पाऊले उचलली आहेत. या बदललेल्या विचारांचा परिणाम म्हणजे आता मुस्लिम मुलीही संस्कृत शिकू लागल्या आहेत आणि संस्कृत शिकवून आपलं भविष्य बनवायचं त्या स्वप्न पाहू लागल्या आहेत. मेरठच्या इस्माइल डिग्री कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिकणाऱ्या अनेक मुलींनी संस्कृत विषय निवडला आहे. त्यांचं म्हणणं आहे की आजपर्यंत त्यांनी संस्कृतचे  ‘अहम् आवाम् वयम्’ सुद्धा माहित नव्हते. मात्र आता त्या संस्कृतमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त करून आपले भविष्य घडवणार आहेत.

या मुलींने सांगितले की जेव्हा त्यांनी घरात संस्कृत विषय शिकण्याविषयी सांगितले तेव्हा त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या उत्साह वाढवला. ह्या मुलींनी इंग्रजी आणि राज्यशास्त्रासोबतच संस्कृत विषय निवडला आहे. काहींनी म्युझिक सोशियोलॉजी सोबत संस्कृत विषय घेतला आहे तर काहींनी संस्कृत, उर्दू आणि  इंग्रजी विषय निवडला आहे.

संस्कृतच्या प्राध्यापक डॉक्टर स्वप्ना शर्मा सांगतात की, ‘यापूर्वीही मुस्लिम मुलींनी संस्कृत विषय घेतला होता. मात्र ह्या वेळेस त्यांची संस्कृतमधली वाढलेली रुची उत्साहवर्धक आहे. संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे. सर्व भाषा  संस्कृतपासूनच निर्माण झाल्या आहेत. अशातच मुस्लिम मुलींनी संस्कृत शिकण्याविषयी दाखवलेला उत्साह सांगतो की आपल्या विचारांवरचा पडदा उठायला लागला आहे. आता तो दिवस दूर नाही जेव्हा मुस्लिम मुली केवळ संस्कृत शिकणार नाही तर शिकवणारही. ‘