आता ‘बॉर्डर’वर शत्रूचं प्रत्येक ‘चक्रव्यूह’ तोडणार ‘अभिमन्यू’, अडकला तर काही सेकंदात देणार ‘बलिदान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाच्या सीमेवर तैनात जवानांचा जीव वाचवणेसुद्धा एक देशसेवा आहे. अशाच विचारातून मेरठच्या तीन युवा वैज्ञांनिकांनी मिळून अभिमन्यू नावाचा मानवरहित रणगाडा बनवून लष्कराला अभेद्य संरक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. याचा सेन्सर जवानांना भूसुरूंगापासून वाचवेल तसेच शत्रूच्या तळात घुसून माहितीसुद्धा घेईल. हा रणगाडा लेझर गनद्वारे हल्लासुद्धा करेल आणि जर शत्रूच्या हाती लागला तर काही सेकंदातच तो आपले बलिदान सुद्धा देईल.

मेरठच्या आयआयएमटी विद्यापीठातील तीन विद्यार्थ्यांनी हे थक्क करणारे काम करून दाखवले आहे. तसेच लखनऊमध्ये झालेल्या डिफेन्स एक्सपोमध्येसुद्धा या प्रयोगाचे कौतूक झाले आहे. या तीन युवा वैज्ञानिकांची ही स्टोरी नक्कीच सर्वांना थ्री इडियट्स चित्रपटाची आठवण करू देईल.

पेटेन्टसाठी केला अर्ज
मेरठच्या आयआयएमटी विद्यापीठाचे युवा वैज्ञानिक संदीप वर्मा, अक्षय राज, वैभव शर्मा आणि रिसर्च टीमने मोठ्या कालावधीपासून या प्रोजेक्टवर काम केल्यानंतर आता एमएसएमई मंत्रालयाकडे पेटंटसाठी अर्ज केला आहे. टँकमध्ये जीएसएम प्रोटोकॉलचा प्रयोग करण्यात आला आहे. याचा मॅग्नेटिक सेन्सर लष्कराच्या रस्त्यातील भूसुरूंगाचा शोध घेऊन सेंट्रल सर्वरला माहिती देईल. टँकमधील सेन्सर उपकरण 180 डिग्री ते 360 डिग्रीपर्यंत फिरून आजूबाजूच्या स्थितीची वेगाने माहिती घेतो. जर शत्रूने हल्ला केला तर टँकच्या समोरील लेझर गन त्यांना नष्ट करू शकते. लष्करासाठी तयार केलेल्या या उपकरणाची किंमत 80-90 लाख रुपये ठरवण्यात आली आहे.

मेरठच्या आयआयएमटी विद्यापीठाचे चान्सलर म्हणाले की, या प्रोजेक्टबाबत आम्ही नियमित पाठपुरावा केला आहे. सीमा सुरक्षा, नक्षली क्षेत्र आणि दुर्गम भागात हा रोबोट जवानांचा जीव वाचवू शकतो तसेच शत्रूला नाकीनऊ आणू शकतो. हा रोबोटिक टँक दोन मीटर लांब आणि सव्वा मीटर उंच आणि त्याचे वजन 70 किलो आहे. हा प्रोजेक्ट पेटंटसाठी पाठवण्यात आला आहे. अभिमन्यू 30 डिग्रीमध्ये वळणार्‍या कॅमेर्‍याच्या मदतीने शत्रूच्या कंट्रोल रूमच्या सर्व सूचना जवानांपर्यंत पोहचवू शकतो. तो सर्व वातावरणात प्रभावीपणे काम करतो. शत्रूच्या हातात सापडल्यानंतर तो स्वत:ला उडवून देऊ शकतो. तसेच हा टँक पाच किलोमीटर परिसरात पसरलेली शत्रूची उपकरणे उध्वस्त करू शकतो.