अमेरिकेत बॅन होण्यापूर्वी विक्रीसाठी तयार TikTok, मायक्रोसॉफ्टशी चर्चा सुरू

वॉशिंग्टन : मीडियामध्ये शुक्रवारी (31 जुलै) आलेल्या वृत्तानुसार तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्ट ही टिकटॉकचे अमेरिकेतील हक्क घेण्यासंदर्भात चर्चा सुरू करत आहे. तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, त्यांचे प्रशासन चीनची मालकी असणार्‍या या व्हिडिओ अ‍ॅपवर प्रतिबंध लावण्याचा विचार करत आहे.

ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांना सांगितले की, आम्ही टिकटॉकवर विचार करत आहोत. शक्यता आहे की, आम्ही टिकटॉकला प्रतिबंधित करू. भारताने टिकटॉकसह 106 चीनी अ‍ॅपवर प्रतिबंध लावला आहे आणि या पावलाचे अमेरिकन प्रशासन आणि खासदारांनी स्वागत केले आहे. ट्रम्प एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, आम्ही काही अन्य गोष्टीही करू शकतो. अनेक पर्याय आहेत. परंतु, यादरम्यान खुप काही होत आहे. तर पहावे लागेल की, काय होत आहे. पण टिकटॉकबाबत आम्ही अनेक पर्याय पहात आहोत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले संकेत
वॉल स्ट्रीट जर्नलने शुक्रवारी (31 जुलै) रात्री बातमी दिली की, मुळ भारतीय वंशाचे अमेरिकन सत्य नडेला यांच्या नेतृत्वाखालील कंपनी मायक्रोसॉफ्ट टिकटॉकचे अमेरिकन कामकाज ताब्यात घेण्याबाबतची चर्चा खुप पुढे गेली आहे. हा सौदा अरबो डॉलरचा होऊ शकतो. वृत्तपत्राने म्हटले आहे की, प्रकरणाची माहिती ठेवणार्‍या लोकांनुसार सोमवारपर्यंत एक सौदा पूर्ण होऊ शकतो आणि या चर्चेत मायक्रोसॉफ्ट, बायटडन्स आणि व्हाईट हाऊसचे प्रतिनिधी सहभागी होऊ शकतात. चर्चेत बदल शक्य आहे आणि सौदा रद्द सुद्धा होऊ शकतो.

चीनची बायटडन्स टिकटॉकची मुळ कंपनी आहे. काही आठवड्यांपूर्वी, अमेरिकन परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनी टिकटॉकवर अमेरिकनांची खासगी माहिती एकत्र करण्याचा आरोप केला होता. त्यांनी सभागृहात परदेशी प्रकरणांसबंधी समितीच्या सदस्यांना गुरूवारी (30 जुलै) सांगितले की, भारताने टिकटॉकसह 106 चीनी अ‍ॅपला प्रतिबंध घातला आहे जे त्यांच्या नागरिकांच्या वैयक्तिक सुरक्षेला धोका निर्माण करत होते. मीडियात आलेल्या बातम्यांमध्ये सुद्धा हे म्हटले आहे की, ट्रम्प प्रशासन लवकरच बायटडन्सला टिकटॉकच्या अमेरिकेतील संचालनाच्या मालकीपासून वंचित करू शकते.