धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंसमोर भावनिक विधान, म्हणाले- ‘या आशीर्वादापुढे कोणतेही संकट तोकडे’

गहिनीनाथ/पाटोदा : पोलीसनामा ऑनलाईन : माजी पालकमंत्र्यांनी दिलेल्या शुभेच्छा घेऊन जिल्ह्यात येत्या 4 वर्षात विकासाचे असे काम करू की पुढील अनेक वर्षे त्यांना आम्हाला शुभेच्छा द्याव्या लागतील असं विधान बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनजंय मुंडे(Dhananjay Munde) यांनी केलं. संत वामनभाऊ महाराज यांच्या 45 व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गड येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, मागील सरकारच्या काळात ब दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या गहिनीनाथ गडास मागील सरकारच्या काळात विविध विकासकामांसाठी 25 कोटींचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात फक्त दोन कोटी रुपये प्राप्त असल्याची कबुली माजी आमदार भीमराव धोंडे यांनी दिली.

पुढं बोलताना मुंडे म्हणाले, रखडलेले 23 कोटी रुपये व अधिकचे 5 कोटी रुपये निधी राज्य सरकारच्या माध्यमातून या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी येत्या दोन वर्षात उपलब्ध  करून देऊ असा शब्दही त्यांनी यावेळी बोलताना दिला. ऊसतोड मजुरांचा जिल्हा ही ओळख पुसून टाकून सर्वाधिक ऊस पिकवणारा जिल्हा अशी ओळख निर्माण करून देणं आणि जिल्ह्याचा मागासलेपणा दूर करणं हा आपला निर्धार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

यावेळी गहिनीनाथ गडाचे महंत हभप विठ्ठल महाराज शास्त्री, खा. प्रीतम मुंडे, आ. बाळासाहेब काका आजबे, माजी मंत्री पंकजा मुंडेसह तर अनेक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

धनंजय मुंडे म्हणाले, गेल्या 17 वर्षांपासून आपण गडावर पुण्यतिथीनिमित्त आयोजित महापूजेस येत असून महापूजेचा हा मान आपल्यासाठी कोणत्याही पदापेक्षा मोठा आहे असंही ते म्हणाले.

‘या आशीर्वादापुढं कोणतंही संकट तोकडं’

वामनभाऊंच्या प्रति आपली श्रद्धा आज इथपर्यंत या पदापर्यंत मला घेऊन आली. गडाचा भक्त म्हणून मी नेहमीच कृतज्ञ राहिन, जिल्ह्यातील जनतेचे प्रेम हा माझ्यासाठी भाऊंचा- देवाचा आशीर्वाद असून या आशीर्वादापुढं जगातील कोणतेही संकट तोकडे आहे असंही ते म्हणाले.