राज ठाकरेंना आज रुग्णालयातून डिस्चार्ज, संध्याकाळी लॉकडाऊनवर बोलणार?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शनिवारी (दि.10) लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राज ठाकरे यांच्या पाठीला दुखापत झाल्याने त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर राज ठाकरे यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे. त्यामुळे आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. राज ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला ते उपस्थित नव्हते.

राज ठाकरे यांना शनिवारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या कंबरेजवळच्या स्नायूवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. कंबरेचा स्नायू दुखावला गेल्याने त्यांना बसण्यास त्रास होत होता. काही दिवसांपूर्वी उपचारासाठी लीलावती रुग्णालयात एमआरआय चाचणी केली होती. त्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याच सल्ला दिला होता. त्यानुसार काल ते रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. आता त्यांची प्रकृती ठिक असून डॉक्टरांनी त्यांना काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

लॉकडाऊनबाबत काय बोलणार ?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी कोरोनाची साखळी तोडण्याची गरज आहे. आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. राज्यात लॉकडाऊनला पर्याय नाही. संसर्ग झालेला एक रुग्ण 25 जणांना बाधित करतो. त्यामुळे ही साखळी तोडणे आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणात तरुण, लहान मुले बाधित होत आहेत.त्यामुळे एकमुखाने निर्णय घेण्याची वेळ आली आहे. यामध्ये राजकारण नको. असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. मात्र, लॉकडाऊनला मनसेचा विरोध आहे.