GST Revenue : GST मधून केंद्र सरकारची मोठी कमाई ! सलग 5 व्या महिन्यात 1 लाख कोटींहून अधिक GST जमा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशाच्या तिजोरीत मोठी भर टाकणारी आनंदाची बातमी मोदी सरकारला मिळाली आहे. सलग पाचव्या महिन्यात 1 लाख कोटींहून अधिक मिळकत जीएसटीच्या माध्यमातून केंद्र सरकारला मिळाली आहे. अर्थमंत्रालयानं जाहीर केलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी 2021 या महिन्यात जीएसटीतून मिळालेलं उत्पन्न 1.13 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या जीएसटीपेक्षा यंदा 7 टक्क्यांनी अधिक रक्कम जमा झाली आहे.

मोदी सरकारला यापूर्वी सकल राष्ट्रीय उत्पन्न अर्थात जीडीपी मध्ये देखील दिलासा मिळाला होता. तिसऱ्या तिमाहीत देशाच्या जीडीपात 0.4 टक्क्यांनी वाढ झाल्याचे पहायला मिळाले होते. केंद्रीय अर्थमंत्रालयाने आज (सोमवार) जाहीर केलेल्या माहितीनुसार, सलग पाचव्या महिन्यात जीएसटीतून मिळालेलं उत्पन्न हे 1 लाख कोटींपेक्षा अधिक आहे. कोरोनाचा काळ असतानाही सरकारला एवढ्या मोठ्या प्रमाणात जीएसटीतून रक्कम मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. जीएसटीमध्ये मिळालेली ही वाढ म्हणजे अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याचे संकेत असल्याचे मानले जात आहे.

केंद्र सरकारला फेब्रुवारी 2021 मध्ये जीएसटीच्या माध्यमातून 1.13 लाख कोटींचे उत्पन्न मिळालं आहे. यामध्ये केंद्राचा वाटा (CGST) 21 हजार 92 कोटी रुपयांचा आहे. राज्याचा वाटा (SGST) 27 हजार 273 कोटी रुपयांचा आहे. एकात्मिक जीएसटीचा (IGST) वाटा तब्बल 55 हजार 253 कोटी रुपयांचा आहे. यामध्ये परदेशातून आयात करण्यात आलेल्या वस्तूंवरील जीएसटीचा समावेश आहे. केंद्राकडून लावण्यात आलेल्या विविध सेसमधून 9525 कोटी रुपये जीएसटीमधून मिळाले आहेत.