आता अहमदाबादच्या पार्कमध्ये दिसला रहस्यमय ‘मोनोलिथ’, कुठून आला कुणालाही माहित नाही

अहमदाबाद : वृत्तसंस्था – जगातील 30 वेगवेगळ्या शहरांमध्ये दिसल्यानंतर आता मोनोलिथ भारतात सुद्धा आला आहे. हे स्ट्रक्चर अहमदाबादच्या थलतेज परिसरातील सिम्फनी पार्कमध्ये आढळले आहे. यास मिस्ट्री मोनोलिथ सुद्धा म्हटले जाते. मोनोलिथ एक स्टीलचे स्ट्रक्चर आहे. याची उंची 6 फुटपेक्षा जास्त आहे. मात्र, हे जमीनीत गाडल्याची कोणतीही खुण दिसत नाही. आश्चर्यकारक गोष्ट ही आहे की, येथे काम करणार्‍या माळ्याला सुद्धा याबाबत काहीही माहित नाही.

माळी आसाराम सांगतात की, ते एक वर्षापासून येथे काम करत आहेत. जेव्ह ते सायंकाळी येथून घरी गेले तेव्हा पार्कमध्ये हे स्ट्रक्चर नव्हते. सकाळी परत ड्यूटीवर आले तेव्हा हे स्टीलचे स्ट्रक्चर येथे दिसले. नंतर त्यांनी गार्डन मॅनेजरला याबाबत माहिती दिली. अजूनपर्यंत हे समजलेले नाही की, हे मोनोलिथ कुठून आले.

त्रिकोणी स्टीलच्या स्ट्रक्चरवर काही नंबर सुद्धा लिहिलेले आहेत. पार्कमध्ये येणारे लोक यास मोठ्या उत्सुकतेने पहात आहेत. याच्यासोबत फोटो काढत आहेत. या स्टीलच्या मोनोलिथवर एकदम वर एक सिम्बॉलसुद्धा आहे. मोनोलिथला अनेक लोक मिस्ट्री स्टोनच्या नावाने सुद्धा ओळखतात.

आतापर्यंत जगात सुमारे 30 देशांमध्ये हे दिसले आहे. सर्वप्रथम अमेरिकेच्या उटाहमध्ये दिसले होते. यानंतर रोमानिया, फ्रान्स, पोलंड, यूके आणि कोलंबियामध्ये दिसले होते. भारतात हे पहिल्यांदा दिसत आहे. याबाबत जगभरात वेगवेगळ्या थेअरीज आहेत. काही लोक हे एलियनचे काम असल्याचे सांगत आहेत.

आश्चर्यकारक गोष्ट ही आहे की, ज्या पार्कमध्ये हे दिसले आहे, ते अहमदाबाद म्युनसिपल कॉर्पोरेशन आणि सिम्फनी कंपनीने एकत्रित पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये बनवले होते. परंतु, हे मोनोलिथ कुठून आले याची माहिती कॉर्पोरेशनच्या अधिकार्‍यांना नाही आणि सिम्फनी कंपनीच्या लोकांनाही याबाबत काहीच माहित नाही.