केरळात मान्सून दाखल

मुंबई : वृत्तसंस्था

पावसाच्या आगमनाची वाट सर्वच जण पाहत आहेत. आता सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून केरळात दाखल झाल्याची माहिती स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने दिली आहे.

दरवर्षी एक जूनला केरळाला धडकणार मान्सून , यंदा दोन ते तीन दिवस आधीच केरळात दाखल झाला आहे. मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर पुढील 24 तासात त्याची वाटचाल दक्षिण-अरबी समुद्र, मालदीव-लक्षद्वीप बेटांचा परिसर, तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालची खाडीचा परिसरात होते.केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर साधारण पुढच्या सात दिवसांत तो महाराष्ट्रात धडकतो. मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी वातावरण अनुकूल असल्याने राज्यातही मान्सूनचं वेळेत आगमन होईल असं म्हटलं जात आहे.

राज्यातील काही भागात पावसाचे आगमन

विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागातून सध्या उष्णता काही प्रमाणात कमी झाल्याची माहितीही स्कायमेटने दिली. पण विदर्भातील ठराविक भागात अजूनही उष्णतेचा तडाखा कायम आहे .

मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी जास्त उष्णता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण विदर्भाच्या काही भागांत हलकासा पाऊस झाल्यामुळे कमाल तापमानामध्ये घट झाली. त्यामुळे सध्या तेथील तापमान 40 अंशांपर्यंत नोंदवले जात आहे. रविवारी सकाळी 8.30 वाजल्यापासून 24 तासात नागपूर येथे 35.8 मिमी, सातारा 33 मिमी, कोल्हापूर 7 मिमी, तर वर्धा येथे 1.6 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असल्याची माहिती स्कायमेटने दिली.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्यामुळे वारे सध्या मध्य प्रदेशाकडून विदर्भ ओलांडून दक्षिण मध्य महाराष्ट्रकडे वाटचाल करत आहे. यामुळे दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही भागांत आणि विदर्भातील काही भागांत पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पुढील 24 ते 48 तासात महाराष्ट्रातील उष्ण लाट सर्व ठिकाणची कामी होऊन तापमानामध्ये सुध्दा घट होईल.

दक्षिण महाराष्ट्रामध्ये 30 मे पासून मोसमी पावसाचं आगमन होईल, अशी अपेक्षा आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाचं आगमन होऊ शकतं, असं स्कायमेटने म्हटले आहे.