मुलीच्या विवाहाच्या दिवशीच आईचा मृत्यू, लग्नमंडपात शोककळा

चाळीसगाव : पोलीसनामा ऑनलाइन –  घरात मुलीच्या लग्नाची सर्वत्र लगबग सुरू असताना आईचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी प्रसंग सीतामाई नगरातील भोकरे परिवारावर मंगळवारी (दि. 8) कोसळला आहे. मात्र, काळजावर दुःखाचा दगड ठेवत परिवाराने हा सोहळा साध्या पद्धतीने पार पाडला. भोकरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संगीता राजेंद्र भोकरे (50, रा. कोठावदे) असे मृत्यू पावलेल्या दुर्दैवी आईचे नाव आहे. मुलीचे हात पिवळे होणे ही कोणत्याही आईसाठी आनंददायी स्वप्नपूर्ती असते. मांगल्याचे हे क्षण अनुभवणे हा जीवनाचा सार्थकी सोहळाच असतो. तथापि, सोहळा पाहण्याआधीच संगीता भोकरे यांना मृत्यूने गाठले. संगीता कोठावदे या प्राथमिक शिक्षिका म्हणून तरवाडे जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होत्या. त्यांचे पती राजेंद्र भोकरे हे (उमरखेड, ता. भडगाव) येथे जि. प. शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांची मोठी मुलगी मयूरी हिचा विवाह मंगळवारी लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात सायंकाळी मुहूर्तावर पार पडणार होता. मात्र, संगीता यांची प्रकृती खालावल्याने विवाह दुपारीच उरकण्यात आला. त्यांच्या पश्चात सासू, पती आणि बारावीत शिकणारा मुलगा असा परिवार आहे.
डोळे पाणावलेले, हुंदका आणि मंगलाष्टके

गेल्या सहा महिन्यांपासून संगीता कोकरे कर्करोगाने आजारी होत्या. त्यांना स्वादुपिंडाचा कर्करोग होता. उपचारही सुरूच होते. मुलीचा विवाह सोहळा असल्याने घरात मंगलमय वातावरण होते. मंगळवारी सकाळीच संगीता यांची प्रकृती खालावली. सव्वा दहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मृतदेह घरात ठेवत आणि दुःखाचा डोंगर पेलत भोकरे परिवाराने मुलीचा विवाह उरकण्याचा निर्णय घेतला. दुपारी साडेबारा वाजता साध्या पद्धतीने मयूरी व नीलेश अमृतकार यांचा विवाह झाला. सायंकाळी साडेसहा वाजता संगीता यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले.