Pimpri : खासदार मनेका गांधींचा फोन आला अन् तपासाची चक्रे वेगाने फिरली

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून फेकल्याने कुत्र्याचा (Dog) मृत्यू झाल्याची घटना चार दिवसांपूर्वी पिंपळे गुरव येथे घडली. या घटनेची खासदार व प्राणीप्रेमी मनेका गांधी (Maneka Gandhi) यांनी थेट सांगवी पोलिसांशी (Sangvi Police) संपर्क साधून सविस्तर माहिती घेत आरोपीवर कडक कारवाईच्या सूचना पोलिसांना दिल्या. मनेका गांधी यांच्या फोननंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून वेगात तपास (investigation) सुरु केला आहे. यातील संशयित निष्पन्न झाले असून चौकशीनंतर लवकरच आरोपींवर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.

पिंपळे गुरवमधील सुदर्शननगर, सृष्टी चौक येथे शनिवारी (दि.12) दुपारी बाराच्या सुमारास अज्ञात आरोपींनी एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन भटक्या कुत्र्याला खाली फेकले. या घटनेत पांढरा रंग त्यावर काळ्या व तपकीरी रंगाचे डाग असलेल्या अंदाजे सात महिने वयाचा हा कुत्रा गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी फरीनजहां विसाल शेख (रा. सुदर्शननगर, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञाताविरोधात भादवी कलम 429 कलमानुार गुन्हा दाखल केला.

दरम्यान, या प्रकरणाची माहिती प्राणीप्रेमी संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी फिर्यादी फरीनजहाँ शेख यांच्याशी संपर्क साधला. तसेच मनेका गांधी यांच्याशी ई-मेल द्वारे संपर्क केला. काही वेळातच मनेका गांधी यांनी दिल्लूहन फोन केला. घडलेल्या घटनेची माहिती घेण्यासह पोलिसांशी बोलणे करुन देण्यास सांगितले. त्यानुसार कार्यकर्त्यांनी खासदार मनेका गांधी व सांगवीचे पोलिस निरीक्षक अजय भोसले यांचा संपर्क करुन दिला.

दरम्यान, खासदार मनेका गांधी यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेत तपास लवकरात लवकर करुन आरोपीवर कडक कारवाई करावी, अशा सूचना पोलिसांना दिल्या.

खासदार मनेका गांधी फोनवरून या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी व चौकशीकरून काही संशयितांची माहिती मिळाली आहे. लवकरच आरोपींपर्यंत पोहचू, असे सांगवी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय भोसले यांनी सांगितले.