पंकजासारखी वाघीण विरोधकांना पुरून उरेल : खा. प्रीतम मुंडे

नाशिक : पोलीसनामा आॅनलाइन – राज्यात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे राजकीय खेळाडूंनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. येत्या काळात राजकीय कब्बडीचा सामना रंगणार असून अनेकांनी पंकजासारख्या वाघिणीला घेरण्याची तयारी केली आहे. मात्र, पंकजा त्यांना पुरून उरतील, असा विश्वास खासदार प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केला. सिन्नर येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांच्या ठिकाणी खासदार मुंडे यांनी भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या.

सोशल मिडियावर महिलेची बदनामी करणारा गजाआड

प्रीतम मुंडे म्हणाल्या, कबड्डी आणि राजकारण यांच्यात एक साम्य आहे. ते म्हणजे खेळाडूला चहूबाजूंनी घेरून त्याला आपल्या तावडीतून सुटू न देणे. सध्या राजकीय कबड्डीलाही सुरुवात झाली असून अनेकांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंना घेरण्यास सुरुवात केली आहे. पंकजांनादेखील अडकविण्याची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, पंकजा ही स्व. गोपीनाथ मुंडे यांचा वारसा चालविणारी वाघीण असून ती एकटी असली तरी सर्वांना पुरून उरेल. ती गेम जिंकूनच मैदानाच्या बाहेर पडले. कबड्डी आणि राजकारण या दोन्ही गोष्टींत खेळाडूची नियत साफ असायला हवी; तरच विजय निश्चित असतो, असेही मुंडे म्हणाल्या.

आपला देश क्रिकेटप्रेमी आहे. मात्र, प्रो कबड्डीपासून या मातीतल्या खेळाचेदेखील लाखो चाहते झाले आहेत. या मातीतल्या खेळाचे सिन्नरसारख्या ठिकाणी इतक्या भव्य स्वरूपात आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे कौतूक वाटते, असे मुंडे म्हणाल्या. यावेळी त्यांच्या हस्ते उपांत्यपूर्व फेरीत विजयी झालेल्या खेळाडूंना पदक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी यावेळी व्यासपीठावर आ. राजाभाऊ वाजे, जि. प. अध्यक्ष शीतल सांगळे, माजी आमदार जयवंत जाधव, उदय सांगळे आदींसह खेळाडू, प्रेक्षक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.