Satara News :खासदार उदयनराजे भोसले ‘स्पॉट’वर, अधिकार्‍यांनी काढला ‘पळ’

कुडाळ : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रीय महामार्गावर वेळे येथे असणारा छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा हा अतिक्रमण विभागात येत आहे. हा पुतळा हलवण्यात यावा म्हणून नोटीस पाठवण्यात आली. यानंतर खासदार उदयनराजे भोसले थेट वेळे येथील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या जवळ येताच तेथील राष्ट्रीय महामार्ग रस्ते विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांनी थेट घटनास्थळावरुन पळ काढला.

महामार्गावरील वेळे येथे असणारा छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा हा महामार्गावरील भू संपादित केलेल्या जमिनीवर आहे. त्या जमिनीवर अतिक्रमणे असल्याच्या नोटिसा जागा मालकांना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर पुतळा हलवण्याची नोटीस राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आली. त्यानंतर पुतळ्याच्या पायथ्याशी शिवभक्तांचा एकचं उद्रेक झाला.

हि घटना जेव्हा खासदार छत्रपती उदयनराजे यांना समजली त्यावेळी त्यांनी थेट आपला मोर्चा वेळे या ठिकाणी वळवला. उदयनराजे हे छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या जवळ पोहोचल्यानंतर त्यांनी तेथील अधिकाऱ्यांना थेट हिम्मत असेल तर पुतळ्याला हात लावून दाखवा असा इशाराच दिला. ज्यावेळी उदयनराजे भोसले येत आहे हि माहीती रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्याला समजताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित शिवभक्तांना दिलासा दिला. मी असेपर्यंत हा अश्वारूढ पुतळा काढण्याची हिम्मत कोणाची असेल तर समोर यावे असा आधार उदयनराजे यांनी तेथील शिवभक्तांना दिला. त्यानंतर तेथील लोकांनी आनंद व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि जय भवानी जय शिवाजी च्या घोषणा दिल्या.