महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शेतकरी धुळीला; धानोरीतील 4 एकर ऊस जळून खाक

पुणे – महावितरण कंपनीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे ऊस पिक जळून खाक होत आहे. विजेच्या लोंबकळणाऱ्या तारांविषयी वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, त्याचा फटका धानोरी (ता. शिरुर) येथील शेतकऱ्याचा चार एकर ऊस जळून खाक झाला आहे. ही घटना 28 जानेवारी रोजी घडली. महावितरण कंपनीने तातडीने लोंबकळणाऱ्या विजवाहक तारांची दुरुस्ती करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रामदास कोतवाल यांनी केली आहे.

शहाजी बबनराव भोसुरे व स्वप्निल शांताराम भोसुरे (दोघे रा. पांढरेवस्ती, धानोरी, ता. शिरुर, जि. पुणे) अशी ऊस जळून झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.

शहाजी भोसले यांचा पांढरेवस्ती (धानोरी, ता. शिरुर) येथे तीन एकर क्षेत्रामध्ये ऊस होता. त्यांच्याच शेजारी स्वप्नील भोसुरे यांचा एक एकर ऊस आहे. ऊसाच्या शेतातून विजेच्या तारा लोंबकळत असून, तारा एकमेकांना चिकटून ठिणग्या पडत असल्याबाबतची तक्रार महावितरण कंपनीकडे केली होती. मात्र संबंधित अधिकाऱ्यांची त्याची दखल घेतली नाही. त्यामुळेच ऊसाला आग लागून मोठे नुकसान झाल्याचे भोसुरे यांनी सांगितले.

भोसुरे यांनी सांगितले की, 28 जानेवारी रोजी वीजवाहक तारांमधून ठिणग्या पडू लागल्या. त्यामुळे अचानक उसाच्या पाचटाने पेट घेतला आणि क्षणार्धात आग भडकली. त्यामध्ये चार एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक होताना उघड्या डोळ्याने पाहण्याशिवाय आम्ही काहीच करू शकलो नाही, हे आमचे दुर्दैव आहे. शेतकऱ्यांकडे जेव्हा शेतमाल असतो, त्यावेळी त्याला भाव मिळत नाही. हातातोंडाशी आलेले पिक असे जळून जाताना जीव मेल्याहून मेल्यासारखा होतो. आता आम्ही कोणाकडे दाद मागायची असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शासकीय पंचनामे आणि त्यानंतर मिळणारी भरपाई या साऱ्या गोष्टी फक्त कागदावरच राहतात. भरपाई मिळेल या आशेने तलाठी आणि तहसीलदारांकडे वारंवार चकरा मारायच्या आणि शेवटी हातात काहीही मिळत नाही, असा अनुभव आतापर्यंतचा आहे. मागिल दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे नुकसान झाले, त्यांना अद्याप भरपाई मिळाली नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढू लागल्याची पुष्ठीही त्यांनी जोडली.