स्कॉर्पिओनंतर आता मुकेश अंबानींच्या निवासस्थानाजवळ सापडली बेवारस दुचाकी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार आढळल्याने राज्यात गोंधळ उडाला असतानाच, आता यानंतर त्याच ठिकाणी एक बेवारस दुचाकी आढळल्याने खळबळ उडाली आहे. हि दुचाकी मंगळवारी सापडली आहे. तर या दुचाकी गाडीचा स्कार्पिओ कारशी काही संबंध आहे का? या संदर्भातही गावदेवी येथील पोलीस तपास करत आहेत.

ज्या ठिकाणी स्कार्पिओ आढळलेली होती त्याच ठिकाणी मंगळवारी दुपारी मलबार हिल येथील वाहतूक पोलिसांच्या नजरेत एक राखाडी रंगाची सुझुकी एक्सेस (MH 01 DD – 2225 ) दुचाकी आढळून आली. स्कॉर्पिओ प्रकरणानंतर अधिक सावध झालेल्या पोलिसांनी यासंदर्भात गावदेवी पोलिसांना कळविले. तर घटनेची माहिती मिळताच गावदेवी पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले. दुचाकी गाडीच्या नंबरवरून त्याच्या मालकाची माहिती समजली नाही. तसेच पोलिसांच्या वाहन ॲपमध्ये दुचाकी नंबरची कुठलीही नोंद नाही. तर या दुचाकीचा क्रमांक बनावट असल्याचा संशयही पोलिसांना आहे. पोलिसांनी आरटीओला (RTO) दुचाकीचा नोंदणी क्रमांक, इंजिन क्रमांक आणि चेसिस क्रमांक देऊन मालकाचे मालकाची संपूर्ण माहिती देण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, २५ फेब्रुवारी रोजी अंबानी यांच्या घराजवळ आढळलेल्या स्फाेटकांनी भरलेल्या स्काॅर्पिओ आणि स्कॉर्पिओ मालक हिरेन यांच्या हत्याबाबत NIA, ATS अधिक तपास करीत असताना, हा दुचाकीचा प्रकार समोर आला आहे. तर ही दुचाकी चोरीची असल्याचा संशय पोलिसांना आहे. परंतु, त्याचे स्कॉर्पिओ आणि हिरेन प्रकरणाशी काही संबंध आहे का? या दिशेनेही पोलीस अधिक तपास सुरू आहे. अशी माहिती गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पीआय राजभर यांनी दिली. तसेच त्या ठिकाणावरील सीसीटीव्हीच्या मदतीने ही दुचाकी कोणी व कधी पार्क केली? याबाबतही पथक अधिक तपास करीत आहे.