‘शक्तिमान’ मुकेश खन्नांनी का नाही केलं लग्न ? स्वत:च केला ‘खुलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भीष्म पितामह आणि शक्तीमानसारखी लोकप्रिय भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना आजही अविवाहित आहेत. एक काळ असा होता जेव्हा मुकेश खन्ना लग्नामुळं सतत चर्चेत असत. कालांतरानं या चर्चा थांबल्या. पण मुकेश खन्ना यांनी लग्न का केलं नाही हा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहिला. आता खुद्द मुकेश यांनीच याचं उत्तर दिलं आहे. एका युट्युब चॅनलवर बोलताना त्यांनी याबाबत खुलासा केला आहे.

…म्हणून मुकेश खन्ना आजही अविवाहित
मुकेश खन्ना म्हणाले, “एकेकाळी मी लग्न कधी करणार हा प्रश्न विाचरून लोकांनी मला भंडावून सोडलं होतं. त्यावेळी प्रत्येक पत्रकाराचाही हाच आवडता प्रश्न होता. माझी मुलाखत घ्यायला आलेला प्रत्येक पत्रकार सरतेशेवटी तुम्ही लग्न कधी करत आहात ? हाच प्रश्न विचारायचा. काही लोकांच्या मते मी महाभारतात भीष्म पितामहची भूमिका साकारल्यानं लग्न केलेलं नाही. परंतु खरं नाही. भीष्म पितामह माझ्यासाठी निश्चितपणे आदर्श आहेत. परंतु खऱ्या आयुष्यात मी भीष्म पितामह बनू शकेल इतका मी महान नाही. कोणीच भीष्म पितामह बनू शकत नाही. खरं तर मी लग्न करणार नाही अशी कोणतीही भीष्मप्रतिक्षा मी केलेली नाही.”

‘लग्न हे नशीबात हवं’
पुढं बोलताना ते लिहितात की, “विवाहसंस्थेला माझा अजिबात विरोध नाही. विवाहसंस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. परंतु हो लग्न हे नशीबात हवं हे मात्र खरं. लग्न असंच होत नाही. लग्नाचा अर्थ दोन आत्म्यांचं मिलन. लग्नाच्या गाठी स्वर्गातच पडतात असं म्हणतात ते खरं आहे. 2 लोक भेटतात, लग्नबंधनात अडकतात हे त्यांचं नशीब. ते वरूनच लिहून येतं.”

‘माझ्या लग्नाची कॉन्ट्रोव्हर्सी संपवू या’
मुकेश खन्ना म्हणतात, “तसा मी अनेक कॉन्ट्रोव्हर्सीत सापडलो आहे. माझ्या परखड स्वभावामुळं मी अनेकदा वादात सापडलो आहे. लग्न कदाचित हीसुद्धा माझ्या आयुष्यातील अशीच एक कॉन्ट्रोव्हर्सी आहे जी मला संपवायची आहे. आता तर माझ्यासाठी कोणतीच मुलगी जन्म घेणार नाही. तेव्हा ही कॉन्ट्रोव्हर्सी इथंच संपवू या” असंही ते म्हणाले.

मुकेश यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 80 च्या दशकात त्यांनी करिअरची सुरुवात केली होती. महाभारत या मालिकेनं त्यांना एक नवीन ओळख मिळाली. 1997 मध्ये मुकेश खन्ना यांनी स्वत:च्या प्रॉडक्शन हाऊसखाली शक्तिमान ही मालिका बनवली. या मालिकेनंही इतिहास रचला. सौगंध, सौदागर, बेताज बादशाह, ताकत, हेराफेरी, बारूद अशा अनेक सिनेमात त्यांनी काम केलं आहे.