प्रसिध्द बार टेंडर पंकज कामळेंची हॉटेलमध्ये आत्महत्या; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होता नावावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   प्रसिद्ध बार टेंडर व इव्हेंट कंपनीचा मालक पंकज कामळे (Pankaj Kamle) यांनी हॉटेलच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येमागचे कारण प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जात असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. बार टेंडर (Bar tender) म्हणून पंकज यांचे नावही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.

मुंबईत राहणारे पंकज कामळे हे चार इव्हेंट कंपनीचे मालक होते. त्यांची ओळख केवळ मुंबईतच नाही तर बाहेरही प्रसिद्ध बार टेंडर म्हणून होती. पंकज आपल्या टीमसोबत इंदूर येथे आमदार संजय शुक्ला यांच्या मुलाच्या लग्नाचा इव्हेंट आयोजित करण्यासाठी गेले होते. ते एका हॉटेलमध्ये थांबले होते. त्याच हॉटेलच्या रुममध्ये त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. हॉटेलचे व्यवस्थापक आणि पंकजच्या टीमने या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलीस घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. घटनास्थळी तपासादरम्यान पोलिसांना पंकजची नोट बुक सापडली असून ज्यात आय लव्ह यू नीलम असे लिहिले आहे. पोलिसांनी ही नोटबुक ताब्यात घेतली आहे.

या वेळी पंकजचा भाऊ बेनी प्रसाद म्हणाला की, पंकजची टीम रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमात काम करत होती. पंकज तिथे उपस्थित होते. पण त्याच वेळी त्याने तब्येत बरी नसल्याचे सांगून हॉटेलमध्ये निघून गेला. सकाळी जेव्हा ते लोक हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा पंकज आपल्या खोलीत फासावर लटकलेला दिसून आला. ज्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. पंकजच्या नोटबुकमध्ये नीलम नावाच्या मुलीचा उल्लेख आहे. प्राथमिक तपासात ही घटना प्रेम प्रकरणात घडल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी सांगितले की पंकजच्या नोटबुकमध्ये एक कोटी रुपयांचा उल्लेख आहे. त्याने कुटुंबीयांना एक मेसेज पाठवला होता. मात्र पोलिसांनी त्याबाबत काही सांगण्यास नकार दिला.