‘या’ गुन्ह्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला 10 वर्षे कारावास, 5 लाखांचा दंड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अजय गोसालिया यांच्यावर 2013 मध्ये हल्ला करुन त्यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला 10 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. छोटा राजन याच्यासह इतर आरोपींना आज न्यायालयाने दोषी ठरवले.

काय आहे प्रकरण ?

अजय गोसालिया हा आधी बुकी होता. त्यानंतर तो बांधकाम क्षेत्रात उतरला. 28 ऑगस्ट 2013 मध्ये गोसालिया याच्यावर मालाड पश्चिमेला असलेल्या मॉलमधून बाहेर येताना तिघांनी गोळीबार केला होता. हा हल्ला छोटा राजन याच्या सांगण्यावरुन करण्यात आल्याचा आरोप सीबीआयने केला होता. सतीश कालिया या आपल्या साथिदाराकडून छोटा राजनने हा हल्ला केला होता. यामध्ये गोसालिया हा गंभीर जखमी झाला होता. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात गोसालियाच्या सोन्याच्या पेंडटला गोळी लागल्याने तो थोडक्यात बचावला होता.

आरोपींवर मोक्का लावण्यात आला

गोसालिया याच्यावर करण्यात आलेल्या हल्ला प्रकरणी बांगूर नगर पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. आयपीसीच्या अनेक कलमांतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर या गुन्ह्याचा तपास डीसीबीकडे सोपवण्यात आला. या गुन्ह्यत आरोपींवर मोक्का लावण्यात आला. स्पेशल युनिट सातने आरोपींविरोधात नोव्हेंबर 2013 मध्ये आरोपपत्र दाखल केले. प्रकाश निकम, सतीश कालिया आणि छोटा राजन वाँटेड होते.

पोलिसांनी पत्रकार जे डे हत्या प्रकरणात प्रकाश निकम आणि सतीश कालिया यांना बेड्या ठोकल्या. तर छोटा राजन याला बालीवरुन भारतात आणण्यात आले. यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. 21 एप्रिल 2016 रोजी सीबीआयने गोसालिया प्रकरणात राजनला ताब्यात घेतले.