Mumbai : सायन मेडिकल कॉलेजच्या उपअधिष्ठातांना अटक, MD प्रवेशासाठी 50 लाख रुपये उकळले

मुंबई : सायन रुग्णालय मेडिकल कॉलेजमध्ये एमडीसाठी प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली डॉक्टर महिलेकडून ५० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी कॉलेजचे उपअधिष्ठाता राकेश रामनारायण वर्मा (वय ५४) यांना सायन पोलिसांनी अटक केली आहे.
याबरोबरच मुंबईतल्या सायन, केईएमसह विविध मेडिकल कॉलेजमध्ये सरकारी कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या  टोळीचा पर्दाफाश सायन पोलिसांनी केला आहे.

याप्रकरणी अलीशा अब्दुल्ला शेख (वय २८, रा. मंदसौर, मध्यप्रदेश) या डॉक्टर महिलेने फिर्याद दिली आहे. सायन मेडिकल कॉलेजमध्ये एम डीसाठी प्रवेश मिळवून देण्यासाठी कॉलेजचे उपअधिष्ठाता राकेश वर्मा यांनी ५० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार दिली होती. तपासात राकेश वर्मा यांनी कॉर्पोरेशन बँकेच्या खात्यावर २१ लाख १० हजार रुपये फिर्यादीचे वडिल अब्दुल शेख यांच्या खात्यावरुन घेतले असल्याचे निष्पन्न झाले. राकेश वर्मा यांना पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केल्यावर त्यांनी ५० लाख रुपये घेतल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली. अशा प्रकारे फसवणुक करुन इतर विद्यार्थांची फसवणूक झाली असण्याची शक्यता आहे. अपर पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, उपायुक्त विजय पाटील, सहायक पोलीस निरीक्षक बी. एस. इंदलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ललीता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घुगे, उपनिरीक्षक निकीता नारणे, जाधव, गायकर अधिक तपास करीत आहेत.