महामेट्रोस पालिकेकडून कारणे दाखवा नोटीस 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – पुणे मेट्रो प्रकल्प राबवित असलेल्या महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याने कासारवाडीतील नाशिक फाटा चौकाजवळ महामेट्रोचे पायलिंग रिग मशिन कोसळून दुर्घटना झाली. याचा खुलासा करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस पिंपरी-चिंचवड महापालिकेने महामेट्रोस दिली आहे. यापूर्वीही रस्त्यावरील झाडे हलवून दुसरीकडे लावण्याच्या वेळी महपालिका आणि मेट्रो प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याचे समोर आले होते. त्यावेळी महापालिका मेट्रो प्रशासनावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. यावरून महापालिकेच्या पोकळ धमक्याना मेट्रो प्रशासन घाबरत नसल्याचे दिसत आहे.

नाशिक फाटा चौकातील भारतरत्न जेआरडी टाटा दुमजली उड्डाण पुलाजवळ पिलर (खांब) उभारणीसाठीच्या  फाउंडेशनसाठी (पाया) खोदकाम सुरू आहे. खोदकाम करणारे पायलिंग रिग मशिन शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास रस्त्यावर कोसळले. त्यावेळेस सुरक्षा उपाययोजना काय केल्या होत्या, त्याचा खुलासा करावा, अशी नोटीस पालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी महामेट्रोस दिली आहे.

सदर दुर्घटनेबाबत आपल्यामार्फत योग्य ती खबरदारी घेऊन आपत्ती व्यवस्थापन करण्यात यावे; तसेच, आपण केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाबाबतचा व दुर्घटना घडण्यामागची कारणे महापालिकेस त्वरित अवगत करावे. भविष्यात कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असा सूचनावजा इशारा गावडे यांनी दिला आहे.

गावडे यांनी प्रत्यक्ष दुर्घटनेच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आहे. महामेट्रोच्या अधिकार्‍यांशी चर्चाही केली आहे. त्यानंतर त्यांनी ही नोटीस पालिकेच्या वतीने महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांना दिली असल्याचे गावडे यांनी सांगितले.

सुरक्षा व खबरदारीचा महामेट्रोचा दावा 

महामेट्रोच्या वतीने मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी पुरेशी सुरक्षा व खबरदारी घेण्यात येत आहे. शनिवारच्या दुर्घटनेनंतर त्यामध्ये आम्ही अधिक सावध झालो आहोत. सुरक्षा उपाययोजनेवर अधिक भर दिला जात आहे. महामेट्रोतर्फे सर्व कामांबाबत कटाक्षाने खबरदारी घेण्यात येत आहे. रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी काम सुरू असल्याने पालिका, वाहतूक पोलिसांशी समन्वय ठेवून पूर्वीपासूनच काम केले जात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पत्रास सविस्तर माहिती दिली जाईल, असे महामेट्रोच्या ‘रिच वन’चे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक गौतम बिर्‍हाडे यांनी सांगितले.

मात्र हे सगळे असले तरी खरच यातून मोठी दुर्घटना घडली असती. यपूर्वीही महापालिका आणि मेट्रो प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याचे अनेकदा आढळून आले आहे. मार्गावरील झाड़े हलवून दुसरीकडे लावणे तसेच कट केलेल्या झाडांच्या बदल्यात जादा झाडे लावणे यामध्ये पालिका आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यात तफावत जाणवत होती. याही वेळी महापालिकेने कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. यामुळे महापालिका प्रशासनाच्या पोकळ धमक्याना मेट्रो प्रशासन दाद देत नाही असेच म्हणावे लागेल.