‘दृश्यम’ सिनेमासारखा घराच्या मागे गाढला मृतदेह, अडीच वर्षानंतर खूनाचा गुढ उकललं

कोल्लम : अजय देवगण, तब्बू यांच्या मुख्य भूमिका असलेला निशिकांत कामत दिग्दर्शित ‘दृश्यम’ (२०१५) हा चित्रपट सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनात आजही घर करुन आहे. पण कल्पना करू शकता का ही घटना कधी सत्यात ही उतरली असेल? तर हो …केरळच्या कोल्लममध्ये आरोपीने आपल्या आई आणि पत्नीच्या मदतीनं एका नातेवाईकाची हत्या केली आणि त्याचा मृतदेह घराच्या पाठीमागे दफन केला. विशेष म्हणजे हा प्रकार अडीच वर्षापूर्वी घडला होता, परंतु कुटुंबाकडून हे रहस्य लपवून ठेवण्यात आले होते. एका व्यक्तीला संशय आला त्यानंतर त्याने पोलीस स्टेशन गाठलं. तपासानंतर अखेर या घटनेचा उलगडा झाला.

दरम्यान, मयताचं नाव शाजी पीटर असं आहे जो खूप काळ त्याच्या घरापासून लांब राहत होता. २०१८ मध्ये शाजी घरी परतला मात्र घरच्यांसोबत त्याचे संबंध चांगले राहिले नाहीत. शाजीने त्याच्या छोट्या भाऊ साजिदच्या पत्नीसोबत वाईट वर्तवणूक केली. त्यानंतर साजिदने स्वत:च्या भावाची हत्या केली. हत्या केल्यानंतर आई आणि पत्नीच्या मदतीने त्याने शाजीचा मृतदेह घराच्या पाठीमागे दफन केला होता. ही पूर्ण घटना बॉलिवूड सिनेमा दृश्यमपासून घेतल्याचं सांगितलं जात आहे. या सिनेमातही अशाप्रकारे हत्या करून लोकांना विविध प्रकारे फसवलं जातं.

साजिद पीटर आणि त्याच्या घरच्यांनी हा गुन्हा अडीच वर्ष लोकांपासून दडवून ठेवला. जो कोणी शाजी पीटरबाबत विचारणा करण्यासाठी येत होता त्याला शाजी केरळच्या मल्लापूरममध्ये काम करत असल्याचं सांगितलं जात होतं. हे नाटक तब्बल अडीच वर्ष सुरू होतं. हा गुन्हा पोलिसांच्या नजरेत सापडला नाही. परंतु अखेर या घटनेचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत साजिद पीटर, त्याची आई आणि पत्नीला अटक करण्यात आली.

पोलिसांनी आरोपींच्या मदतीने शाजी पीटरचा मृतदेह पुन्हा बाहेर काढला. तपासात धक्कादायक माहिती समोर आली की, पूर्ण षडयंत्र आखून साजिदने शाजी पीटरची हत्या करून त्याला दफन केले होते. मृतदेहाचा वास येऊ नये यासाठी त्याच्या शरीराला कपड्यांनी झाकलं होतं. या घटनेने समजते की सिनेमातील कथेप्रमाणे खऱ्या आयुष्यातही गुन्हेगारी केली जाते.