Amravati News : मोबाईल चार्जरच्या केबलनं गळा आवळून पतीकडून पत्नीचा खून !

वरूड (अमरावती) : पोलीसनामा ऑनलाईन –   टेंभुरखेडा येथे माहेरी आलेल्या पत्नीची मोबाईल चार्जरच्या केबलनं गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 4 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. दीपक राजेंद्र जिचकार (29, रा. सावंगी, ह. मु. पुसला) असं आरोपी पतीचं नाव आहे, तर अंकिता दीपक जिचकार (23, रा. सावंगी, ह.मु. टेंभुरखेडा) असं मृत पत्नीचं नाव आहे. वरूड पोलिसांनी दीपकला अटक केली आहे. कौटुंबकि वादातून ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

एका वर्षापूर्वी अंकिता आणि दीपक यांचा प्रेमविवाह झाला होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. यामुळं अंकिता टेंभुरखेडा येथे वास्तव्यास होती. आरोपीची सासरी ये जा असायची. आरोपी दीपकनं अंकिताच्या बहिणीच्या साक्षगंधाला विरोध केल्यानं तिच्या आई वडिलांनी दीपकला घरातून बाहेर काढलं होतं. मी एकेकाला पाहून घेईन अशी धमकी देऊन तो गावी परतला होता.

दीपक 4 फेब्रुवारी रोजी टेभुरखेडा येथे आला. घरात कुणी नाही हे पाहून संधी साधत त्यानं पत्नी अंकिता हिचा गळा आवळून खून केला. गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास तिचे आईवडिल घरी आल्यानंतर ही घटना समोर आली. मत अंकिताची लहान बहिण अमृता सुधाकर अळसपुरे (22, रा. टेंभुरखेडा) हिनं वरूड पोलीस फिर्याद ठाण्यात दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

घटनेनंतर आरोपी फरार

पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी दीपक यानं टेंभुरखेड्यातून पळ काढला. तक्रार दाखल झाल्यानंतर वरूड पोलिसांनी शोध सुरू केला. पुसला येथून रात्री 9 च्या सुमारास त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. कलम 302 अंतर्गत दीपक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे, ठाणेदार प्रदीप चौगावकर, एपीआय संघरक्षक भगत यांनीही घटनास्थळी भेट दिली.