Raigad : पर्यटकाची वाढती गर्दी पाहता प्रशासनाचा मोठा निर्णय !

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हाधिकारी निधी चौधरी (Nidhi Chaudhary) यांनी मुरुड-जंजिरा किल्ल्याचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. किल्ल्यावर पर्यटकांची वाढती गर्दी पाहून पोलिसांच्या सुचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. आता 2 जानेवारीपर्यंत किल्ल्याचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद राहणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मुरुड-जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करत आहे. राजपुरी जेटीवर पर्यटकांच्या गर्दीचं नियोजन करणं अवघड जात होतं. सोशल डिस्टेंसिंग आणि मास्क वापरणं असे नियम पर्यटकांकडून पाळले जात नव्हते. वारंवार सूचना देऊनही कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन होताना दिसत होतं. हे लक्षात घेता आता किल्ल्याचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सलग येणाऱ्या सुट्ट्या आणि नाताळाच सण यामुळं आता हजारो पर्यटक जिल्ह्यात आले आहेत. परिणामी पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी होताना दिसत आहे. यामुळं पोलीस दलाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला खबरदारी म्हणून काही प्रतिबंधात्मक पावले उचलण्यास आवश्यक असल्याचं सूचित करण्यात आलं होतं. यानंतर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी याबाबतचे आदेश जारी केले. 25 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत मुरुड-जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.