मतदान संपताच ‘नमो टीव्ही’ DTH वरुन गायब

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपाचा प्रचार करण्यासाठी लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी नमो टीव्ही सुरु करण्यात आला. सर्व डिश व केबल चालकांना जबरदस्तीने दाखविण्यास लावण्यात आलेला हा नमो टीव्ही वादग्रस्त ठरला होता. तरीही भाजपने कोणताही विरोध न जुमानता सुरु ठेवला होता. मात्र, सातव्या टप्प्यातील मतदान संपताच त्यानंतर काही वेळात नमो टीव्ही वाहिनीचे प्रसारण बंद करण्यात आले आहे.

भाजपाने नमो टीव्ही चॅनेल २६ मार्च रोजी अचानक सुरु केले होते. त्याचे प्रसारण करण्यासाठी सर्वच डिश कंपन्यांवर दडपण आणण्यात आल्याने एका दिवसात ते सर्व डिश कंपन्या, केबल कंपन्यांनी दाखविण्यास सुरुवात केली. नमो टिव्हीवर केवळ भाजपाशी संबंधित कार्यक्रम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषणे व सभाचे प्रसारण केले जात होते.

या विरोधात काँग्रेससह सर्व विरोधकांनी हे आचारसंहितेचा भंग असल्याचे सांगून निवडणुक आयोगाकडे तक्रार केली होती. एप्रिल महिन्यात पहिल्या टप्प्याचा प्रचार थांबल्यावर म्हणजे मतदानाच्या ४८ तास आधि नमो टीव्हीवर रेकॉर्र्डेड शो दाखविण्यास मनाई केली होती. पण, निवडणुक आयोगालाही भाजपाने दाद दिली नाही. मतदानाच्या दिवशीही त्याचे प्रसारण सुरुच होते. शेवटी नमो टीव्हीला निवडणुकीचे थेट प्रक्षेपण दाखविण्यास परवानगी दिली व राज्य निवडणुक आयुक्तांना त्यावर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते.

भाजपाने या चॅनेलच्या प्रसारणासाठीचा खर्च आम्ही पक्षाच्या खर्चात दाखवू असे उत्तर देऊन निवडणुक आयोगाला टोलविले. शेवटी हतबल निवडणुक आयोगाने औपचारिकता म्हणून या टीव्हीवर दाखविण्यात येणारे कार्यक्रमाची अगोदर परवानगी घ्यावी अशी अट टाकण्यात आली.

विरोधकांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडेही त्याबाबत तक्रार केली होती. दुसरीकडे सुब्रम्हयम स्वामी यांनी राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाविषयी केलेल्या अर्जावर तातडीने नोटीस काढणाऱ्या केंद्र सरकारच्या या मंत्रालयाने मात्र, विरोधकांच्या तक्रारीला केराची टोपली दाखविली होती.

आता, सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर १९ मे रोजी सायंकाळी नमो टीव्हीचे प्रसारण बंद करण्यात आले. त्यामुळे केवळ भाजपाचा प्रचार करण्यासाठीच हे चॅनेल सुरु करण्यात आले आहे, हा विरोधकांचा आरोप खरा ठरल्याचे दिसून येत आहे.