मोठी बातमी ! नासाला विशेष यश; थेट मंगळावरच तयार केला ऑक्सिजन

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था –   अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’कडून मंगळ मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यातून नासाला अनेक नवनवी माहिती मिळत आहे. त्यानंतर आता मंगळ मोहिमेत नासाला आणखी यश मिळाले आहे. नासाने मंगळ ग्रहावर ऑक्सिजन तयार केला आहे. हा ऑक्सिजन मंगळावरील कार्बन डायऑक्साइडमधून तयार करण्यात आला आहे.

नासाची मंगळ मोहीम सुरु आहे. त्यानुसार, नासाने Perseverance रोव्हर 18 फेब्रुवारीला मंगळावर उतरले होते. त्यानंतर विविध टप्प्यांमध्ये नासाचे संशोधन सुरू झाले. मंगळ ग्रहावरील वातावरण पृथ्वीपेक्षाही पातळ असल्याचे करण्यात आलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे या ठिकाणी ऑक्सिजन तयार करण्याची प्रक्रिया अधिकच आव्हानात्मक होती. मात्र, नासाच्या संशोधकांनी यामध्ये यश मिळवले आहे. नासाने ‘मॉक्सि’ (MOXIE) हे खास उपकरण मंगळावर पाठवले होते. त्या माध्यमातून ऑक्सिजन तयार केला जात आहे. हे उपकरण टोस्टरच्या आकाराचे असून, या उपकरणाच्या माध्यमातून 5 ग्रॅम ऑक्सिजन तयार करण्यास यश मिळाले.

दरम्यान, मंगळावर तयार झालेला हा 5 ग्रॅमचा ऑक्सिजन अंतराळवीर 10 मिनिटांसाठी श्वास घेण्यासाठी वापरू शकतात. असे जरी असले तरी परग्रहावर ऑक्सिजन तयार करता येणे ही बाब विशेष अशी ठरणार आहे. अशाप्रकारे ऑक्सिजन निर्मिती केल्यामुळे मानवाला परग्रहावर जाऊन वस्ती करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल असल्याचे नासाचे म्हणणे आहे.