CAA : नागरिकत्व कायद्याविरोधात विद्यार्थी पेटले, दिल्लीनंतर हैदराबाद, लखनऊ, मुंबईत आंदोलन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील ईशान्य भारत आणि पश्चिम बंगालमध्ये पेटलेले आंदोलन आता देशातील अन्य भागातही पसरत आहे. काल राजधानी दिल्लीत अनेक भागात या आंदोलनाने हिंसक वळण घेतले होते. आज त्याचे पडसाद मुंबईसह लखनऊ आणि हैद्राबादेतही उमटले आहेत. येथेही आंदोलनाला सुरूवात झाली आहे.

दिल्लीतील कालच्या आंदोलनाची धग अद्याप शांत झाली नसून तेथे आजही निदर्शने केली जात आहेत. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या लायब्ररीत घुसून काल पोलिसांनी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली होती. या मारहाणीचा निषेध ठिकठिकाणी करण्यात येत आहे. येथे विद्यार्थ्यांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे.

आज मुंबईत टाटा इन्सिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या विद्यार्थ्यांनी नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन केले. तसेच, आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी रविवारी रात्री हातात मशाली घेऊन रॅली काढून दिल्लीतील विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शविला. मुंबईत विद्यार्थ्यांनी काढलेल्या रॅलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल होत असून ट्विटरवर #IITBombay हॅशटॅग ट्रेड आहे.

तसेच आज लखनऊमध्ये नदवा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. हैदराबादमधील मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटीमध्येही नागरिकत्व कायद्याविरोधात विद्यार्थी आंदोलन करत आहेत. तसेच, त्यांनी जामिया विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, केरळात मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांनी नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन सुरु आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील संतप्त पडसाद उमटत असल्याने उत्तर प्रदेश सरकारने सहारनपूर, बरेली, अलिगड, बुलंदशहर, कासगंजसह ६ जिल्ह्यात कलम १४४ लागू केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/