Coronavirus : जगातील ‘कोरोना’च्या प्रकरणांची संख्या 6 लाखाच्या ‘पार’, 27000 हून अधिक मृत्यू

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –  जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे ग्रस्त रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. माहितीनुसार शुक्रवारी दुपारी 3 वाजेपर्यंत जगभरात कोरोना व्हायरस पॉझिटिव्हची एकूण संख्या 601,536 वर पोहोचली. त्याचवेळी मृतांची संख्या 27,441 वर पोहचली. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 133,454 आहे.

श्रीमंत तसेच कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्येही चिंतेचे वातावरण

एकीकडे युरोप आणि अमेरिका कोरोना विषाणूच्या जागतिक महामारीशी झगडत असताना इतर समूहांनी असा इशारा दिला की, योग्य पाऊले न उचलल्यास सीरिया आणि येमेनसारख्या कमी उत्पन्न असलेल्या देशांत आणि युद्धग्रस्त देशातील कोट्यवधी लोक आपला जीव गमावू शकतात. जिथे आधीच स्वच्छतेची वाईट परिस्थिती आहे.

आफ्रिकन युनियनच्या मते आफ्रिकेतील अधिकृत संख्या अजूनही कमी आहे. शुक्रवारपर्यंत 83 लोक मरण पावले असून 3200 हून अधिक लोक संसर्गित झाले. आंतरराष्ट्रीय बचाव समितीने (आयआरसी) एका निवेदनात म्हटले आहे की, “शरणार्थी, घरातून विस्थापित झालेली कुटुंबे आणि व्यथित भागात राहणाऱ्या लोकांना या आजाराचा सर्वाधिक त्रास होईल.” आयआरसीच्या मिस्टी बुसवेल यांनी सांगितले की, युद्धग्रस्त सीरियामधील बंडखोरांचा शेवटचा मजबूत गड इदलिब प्रांत, अशा भागांचा धोका आहे, जेथे साथीचा प्रादुर्भाव होण्यापूर्वीच मानवतावादी संकट आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांनी दिलेल्या चेतावणीत म्हंटले कि, जगभरात तीन अब्ज लोकांची पाणी आणि साबणापर्यंत पोहोच नाही, जो या संसर्गजन्य रोगापासून बचावाची मूलभूत शस्त्रे आहेत. येमेनमध्ये, इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉसच्या समितीने रविवारी ट्वीट केले की, कोरोना विषाणूपासून बचाव करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे वारंवार हात धुणे होय, परंतु येमेनच्या अर्ध्या लोकसंख्येचे काय जिथे स्वच्छ पाणीदेखील नाही?