नक्षल उपकमांडर ज्योतीचे अखेर आत्मसमर्पण

गडचिरोली : वृत्तसंस्था
नक्षल उपकमांडर ज्योती उर्फ रविना जोगा पुडयामीने (वय : २६) आज बुधवारी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. तेलंगणात कार्यरत असलेली ज्योती मंगी दलमची उपकमांडर होती. ज्योतीवर चार लाख रुपयांचे बक्षीस राज्य शासनाने ठेवले होते.

महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण योजनेमुळे तिला विविध प्रकारचा लाभ दिला जाणार आहे. छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्याच्या भोपालपट्टनम येथील मूळची रहिवासी असलेली ज्योती नोव्हेंबर २००९ मध्ये नक्षल्यांच्या भोपालपट्टनम दलममध्ये भरती झाली होती. तेव्हापासून अनेक नक्षली कारवायांत तिचा सक्रिय सहभाग होता. तेलंगणा भागात कार्यरत मंगी दलममध्ये ती आतापर्यंत उपकमांडर म्हणून कार्यरत होती. मात्र महाराष्ट्र शासनाने नक्षल चळवळीपासून दूर होणाऱ्यांना पुढील जीवन चांगले जगता यावे यासाठी आत्मसमर्पण योजनेतून विविध प्रकारचे लाभ देणे सुरू केल्याने नक्षल नेते व चळवळीचे सदस्य पोलिसांना शरण येत आहेत. भूखंड, आर्थिक मदत, रोजगार, नसबंदी पुन्हा उघडणे यासारख्या माध्यमातून आत्मसमर्पितांचे पुनर्वसन घडवून आणल्या जात असल्याने सन २०१८ च्या चार महिन्यात नऊ माओवाद्यांनी पोलीस अधीक्षकांसमोर आत्मसमर्पण केले आहे. इतरांनीही हिंसक मार्ग सोडून मूळ प्रवाहात परत यावे व आत्मसमर्पण करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी केले आहे.