हा भारतीय तरुण असेल व्हॉट्सअॅपचा संभाव्य सीईओ ?

व्हॉट्सअॅप सारख्या रोज असंख्य नवे युजर्स होणाऱ्या समाज माध्यमाचा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदासाठी भारतीय तरुणाचे नाव सध्या आघाडीवर आहे. नीरज अरोरा हे मूळचे भारतीय असून त्यांची व्हॉट्स अॅपच्या सीईओपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. नीरज अरोरा हे गेली सात वर्षांपासून व्हॉट्स अॅपमध्ये कार्यरत आहेत.

व्हॉट्स अॅपचे सहसंस्थापक जेन कॉम यांनी चार दिवसांपूर्वी कंपनीचा निरोप घेतला. त्यामुळे आता व्हॉट्स अॅपच्या सीईओपदी नक्की कोणाची नियुक्ती होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या स्पर्धेत नीरज अरोरा यांचे नाव आघाडीवर आहे. नीरज व्हॉट्स अॅपमध्ये सध्या बिझनेस एक्झिक्युटिव्ह पदावर कार्यरत आहेत. तंत्रज्ञाना विषयी टेकक्रंच या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार व्हॉट्स अॅपमधील ‘ऑल थिंग्स बिझनेस’ या विभागाचे ते प्रमुख आहेत.

असा आहे नीरज अरोरा यांचा दिल्ली आयआयटी ते व्हॉट्स अॅप पर्यंतचा प्रवास
– नीरज अरोरा हे दिल्ली आयआयटीचे माजी विद्यार्थी आहेत.
– पदवी घेतल्यानंतर २००६मध्ये त्यांनी ‘इंडियन स्कूल ऑफ बिझनेस’मधून ‘एमबीए इन फायनान्स अँड स्ट्रॅटेजी’ केले.
– दिल्ली आयआयटीमधून पदवी घेतल्यानंतर ते अॅसिलिओन या कंपनीत २००० मध्ये कार्यरत होते.
– यानंतर त्यांनी टाइम्स इंटरनेट लिमिटेडमध्येही काम केले. जवळपास १८ महिने ते तिथे कार्यरत होते.
– याशिवाय ते पेटीमच्या संचालक मंडळातही होते.
– विविध कंपन्यांमध्ये काम केल्यावर २००७ मध्ये ते गुगलमध्ये रुजू झाले.
– डिसेंबर २००७ ते नोव्हेंबर २०११ या कालावधीत ते गुगलमध्ये कार्यरत होते. गुगलमध्ये कॉर्पोरेट डेव्हलपमेंट मॅनेजर या पदावरुन ते प्रिन्सिपल कॉर्पोरेट डेव्हलपमेंट या पदावर पोहोचले.
– गुगलनंतर ते व्हॉट्स अॅपमध्ये रूजू झाले.

व्हॉट्स अॅपच्या सीईओपदी अरोरा यांची नियुक्ती झाल्यास ते सुंदर पिचाई (गुगल), सत्या नाडेला (मायक्रोसॉफ्ट) यांच्या रांगेत जाऊन बसतील. मात्र, व्हॉट्स अॅपच्या सीईओपदावर नियुक्ती झाल्यास अरोरा यांच्यासमोर बरीच आव्हाने असतील. व्हॉट्स अॅप विकत घेणाऱ्या फेसबुकवर डेटा चोरीच्या आरोपांमुळे टीका होत आहे. व्हॉट्स अॅपचे सहसंस्थापक जेन कॉम यांचे बिझनेस मॉडलवरुनच कंपनीशी मतभेद झाले आणि त्यांनी राजीनामा दिला,अशी चर्चा आहे. या सर्व गोष्टींवर मात करत ते कंपनीला कसे सांभाळतात याकडे सर्वांचे लक्ष राहील.