‘ह्युमन राईट’मुळे अल्पवयीन मुलाची देहांताची शिक्षा टळली

बैरुत : वृत्तसंस्था – सरकारविरोधी निदर्शने करणाऱ्या, दहशतवादी संघटनेत सामील झाल्याचा आरोप असलेल्या सौदी अरेबियातील एका अल्पवयीन मुलाला आंतरराष्ट्रीय दडपणामुळे देहांताऐवजी १२ वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आली आहे.

मूर्तझा कुएरिस असे या मुलाचे नाव आहे. तो शियापंथीय असून आता अठरा वर्षांचा झाला आहे.
सौदी राजघराण्याच्या विरोधकांना तसेच शियापंथीय आरोपींना तेथील न्यायालये अत्यंत कडक शिक्षा सुनावतात. मात्र एखाद्या अल्पवयीन मुलाला कठोर शिक्षा सुनावण्याचा सौदी अरेबियातील हा विरळा प्रसंग आहे.

सौदी अरेबियाने देहांत शिक्षेचे कायमच समर्थन केले आहे. तिथे गुन्हेगाराचा शिरच्छेद केला जातो. यंदाच्या वर्षी सौदी अरेबियामध्ये ३७ गुन्हेगारांना देहांताची शिक्षा देण्यात आली. त्यातील बहुसंख्य आरोपी शियापंथीय होते. दहशतवादी कारवायांत सहभागी झाल्याचा आरोप त्यांच्यावर होता. मूर्तझा १० वर्षांचा असताना सरकारविरोधी निदर्शनांत सहभागी झाला होता. हाती शस्त्र घेऊन दहशतवादी बनला होता असे त्याच्यावर आरोप आहेत. मूर्तझाला वयाच्या तेराव्या वर्षी अटक करण्यात आली. तेव्हापासून तो तुरुंगातच आहे.

त्याला न्यायालय देहांताची शिक्षा देण्याच्या विचारात आहे याची कुणकुण मानवी हक्क गटांना लागली होती. मूर्तझाच्या प्रकरणाचा गेली अनेक वर्षे युरोपियन सौदी ऑर्गनायझेशन फॉर ह्युमन राइट्स या संघटनेकडून पाठपुरावा करण्यात येत होता. या संघटनेचे संचालक अली अदूबिसी यांनी सांगितले की, मूर्तझाला चांगल्या वागणुकीच्या अटीवर (प्रोबेशन) चार वर्षे ठेवण्यात येईल. त्याची आधीच चार वर्षांची शिक्षा भोगून झालेली आहे. आणखी तीन वर्ष शिक्षा भोगल्यानंतर २०२२ मध्ये त्याची मुक्तता होईल.