जाणून घ्या… समलिंगी विवाहाला मान्यता देणारा पहिला देश कोणता ? कशी झाली सुरुवात ?

तैपेई : वृत्तसंस्था – तैवानच्या संसदेने समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता दिली आहे. त्यामुळे समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा तैवान हा पहिला आशियाई देश ठरला आहे. समलिंगी जोडप्यांनी त्यांची एक संघटना स्थापन करावी अशी संमती देशाच्या विधीमंडळाने दिली. ज्या समलिंगी जोडप्यांना विवाह करायचा असेल त्यांना शासकीय विवाह नोंदणी कार्यालयात अर्ज करता येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. हा निर्णय तैवान या देशाच्या घटनेचे उल्लंघन करणारा आहे. त्यामुळे २४ मे पर्यंत या संदर्भातील घटना दुरुस्ती करण्यास तैवानच्या सर्वोच्च न्यायालयाने मुदत दिली आहे.

तैवानमध्ये समलिंगी विवाहाचा कायदा लागू करण्यात यावा यासाठी ची चिया वेई यांनी सुमारे ३० वर्षे लढा दिला. त्यांनी २०१५ मध्ये न्यायालयात यासंबंधीची एक याचिकाही दाखल केली होती. तीन समलिंगी जोडप्यांचा विवाहाचा अर्ज नाकारल्याने त्यांनीही न्यायालयात दाद मागितली होती. तैपेई शहर प्रशासनानेही समलिंगी जोडप्यांच्या विवाहाला मान्यता मिळावी म्हणून न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

तैवानमध्ये मोठ्या प्रमाणावर समलिंगी जोडपे राहतात. त्यामुळे लोकांच्या दबावामुळे समलिंगी विवाहासाठी कायदा करावा की करु नये यासाठी मतदान घेण्यात आले. त्यावेळी प्रचंड पाऊस पडत असला तरी असंख्य समलिंगी जोडप्यांनी भर पावसात मतदानाला हजेरी लावली. त्यामुळे ६७ टक्के लोकांनी समलिंगी विवाहांना मान्यता देण्याच्या बाजूने मतदान केले होते. त्यानंतर आता या कायद्याला मान्यता दिली असून तैवान हा पहिला आशियाई देश ठरला आहे.