..तर बैठा सत्याग्रह करू ; ‘महावितरण’ला पाथर्डीकरांचा इशारा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पाथर्डी शहरातील नवीपेठ, चौंडेश्वरी गल्ली व परिसरामध्ये गेल्या तीन महिन्यापासून वीज पुरवठा खंडीत होत आहे. तांत्रिक बिघाड असल्याने ही अडचण येत आहे. सदरची बिघाडात दुरुस्ती करावी. अन्यथा बैठा सत्याग्रह करण्यात येईल, असा इशारा परिसरातील नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

सुमारे तीन महिन्यांपासून विजेचा लंपडाव सुरु आहे. वेळोवेळी महावितरणच्या वरीष्ठ अधिका-याकडे मागणी करुनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी आज दुपारी वीज वितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता निलेश मोरे आणि शहर सहाय्यक अभियंता वैभव सिंग यांना घेराव घातला. वारंवार वीज खंडीत होत असल्याबाबत जाब विचारण्यात आला.

वीज खंडित झाल्यावर ८ तास या भागाकडे वीज कर्मचारी फिरकत नाही. उन्हाळा असल्याने लहान मुले, जेष्ठ नागरीक व रुग्नांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या भागात व्यावसायिक असल्याने त्यांच्यासह ग्राहकांनाही मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. विशेष म्हणजे या भागातील विजबिल थकीत नसूनही बेजबाबदारपणामुळे ग्राहकांना नेहमीच मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला. एका आठवड्यात मागण्या मान्य न झाल्यास येत्या सोमवारी विद्युत वितरण कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह करण्याचा इशारा देण्यात आल्यानंतर विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले.

यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यात राजकीय पक्षाचे पदाधिकारीही उपस्थित होते. बैठा सत्याग्रहाचा इशारा दिल्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले आहे.

You might also like