Pune News : वाहन चोरीच्या गुन्ह्यातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वाहन चोरीच्या गुन्ह्यातील मोस्ट वॉण्डेड गुन्हेगार पाप्या जाधव याला अटक केली आहे. सराईत गुन्हेगार पाप्या जाधवला खडक पोलिसांनी तडीपार केले आहे. तर समर्थ पोलिस वाहन चोरीच्या गुन्ह्यात त्याचा शोध घेत होते. अखेर समर्थ पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. सूरज उर्फ पाप्या जाधव (वय-20 रा. भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

पाप्या जाधव हा तडीपार असताना देखील तडीपारीचा भंग करुन सार्वजनीक रस्त्यावर कोणाची तरी वाट पहाच उभा असल्याची माहिती पोलीस शिपाई हेमंत पेरणे यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे समर्थ पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच जाधवने पळ काढला. मात्र, पोलिसांनी काही अंतरावर पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले.

आरोपी पाप्याला परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी 2020 मध्ये दोन वर्षासाठी तडीपार केले होते. पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्याने झुरळ्या उर्फ आकाश पाटोळे याच्या मदतीने समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक गाडी चोरल्याची कबुली दिली. पाप्या जाधव याच्यावर एकूण 17 गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदार्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते, पोलिस हवालदार संतोष काळे, सुशिल लोणकर, सुभाष पिंगळे, पोलीस शिपाई निलेश साबळे, हेमंत पेरणे, शाम सूर्यवंशी, सचिन पवार, सुमित खुट्टे, विठ्ठल चोरमले, सुभाष मोरे, महेश जाधव यांच्या पथकाने केली.