NIA कडून 8 तास सर्च ऑपरेशन, सचिन वाझेंच्या कार्यालयातून महत्वाच्या गोष्टी घेतल्या ताब्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या मुंबई पोलीस आयुक्तालयातील कार्यालयात सोमवारी रात्री राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने छापा टाकला. तब्ब्ल आठ तास शोधमोहीम सुरु होती. वाझेंच्या कार्यालयातून दोन डीव्हीआर (सीसीटीव्ही चित्रण साठविण्याचे यंत्र), लॅपटॉप, मोबाइल, आयपॅड, संगणक आणि काही कागदपत्रे पथकाने ताब्यात घेतली आहेत. दरम्यान एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे ती म्हणजे एनआयएने जप्त केलेल्या दोन डीव्हीआरपैकी एक डीव्हीआर वाझे यांचे वास्तव्य असलेल्या ठाण्यातील गृहनिर्माण संस्थेचा असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

वाझे यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक रियाझ काझी यांचा वावर अनेक ठिकाणी आढळल्याने एनआयए गेल्याचे तीन दिवसापासून त्यांच्याकडे चौकशी करत आहे. दरम्यान काझी यांनी वाझे राहात असलेल्या गृहनिर्माण संस्थेसह अन्य भागांतील डीव्हीआर ताब्यात घेतले होते. संस्था पदाधिकाऱ्यांना त्यांच्याच स्वाक्षरीने फौजदारी दंड संहितेतील ४१ कलमानुसार नोटीस बजावली होती. एनआयए प्रवक्त्या जया रॉय यांनी तपास महत्त्वाच्या टप्प्यावर असून या क्षणी कोणतीही माहिती देणे उचित ठरणार नसल्याचे सांगितले.

मुद्देमाल वहीत नोंद नाही
गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे (सीआययू) प्रमुख सचिन वाझे यांच्याकडे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके प्रकरणाचा तपास देण्यात आला. या तपास पथकात सीआययूसह गुन्हे शाखेच्या विविध कक्षांतील अधिकाऱ्यांना सामावून घेण्यात आले.
वाझे यांच्या सूचनेनुसार तपासाच्या निमित्ताने या पथकाने मुंबई, ठाण्यातील निवासी, व्यावसायिक आस्थापनांचे डीव्हीआर ताब्यात घेतले. मात्र, जप्त केलेल्या या यंत्रांची मुद्देमाल यादीत नोंद करण्यात आली नव्हती, अशी माहिती एनआयएला मिळाली. दरम्यान, वाझेंनी स्वत:च्या घराजवळील सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेतले आहे. त्यामुळे अंबानी यांना धमकावण्यासाठी वापरलेली स्कॉर्पिओची चोरी झाली नसून ती वाझेंच्याच ताब्यात होती असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान एनआयएच्या अधिकाऱ्याने सांगितले की या डीव्हीआरमधील चित्रणाबाबत फेरफार आढळल्यास तो आरोपींविरोधात परिस्थितीजन्य पुरावा ठरू शकेल.

वाझेंकडून वरिष्ठांची दिशाभूल ?
अंबानी धमकी प्रकरण, मनसुख हिरेन यांच्या पत्नीने तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप यामुळे सचिन वाझे यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाझे यांच्याकडे विचारणा केली. मात्र हे आरोप खोटे असून या प्रकरणात गुंतवण्याचा प्रयत्न असल्याचे वाझे यांनी वरिष्ठांना सांगितले, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. दुसरीकडे एनआयएने सात अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे त्यामध्ये एक सहायक आयुक्त, एक निरीक्षक, दोन सहायक निरीक्षक आणि तीन अमलदारांचा समावेश आहे.

मर्सिडीजमधून रोकड हस्तगत
एनआयए अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास पेडर रोड येथील कार्यालयात दक्षिण मुंबईतून जप्त करून आणलेल्या मर्सिडीज गाडीची तपासणी केली. या वेळी सचिन वाझे यांनाही कार्यालयाच्या आवारात आणण्यात आले होते. गाडीत रोख रक्कम, कपडे, कागदपत्रे आढळली. रोख रक्कम एनआयए अधिकाऱ्यांनी वाझे यांच्यासमोरच मोजली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धुळे येथील एका व्यक्तीच्या मर्सिडीज गाडीचा क्रमांक हा या गाडीवरील नोंदणी क्रमांक आहे. या व्यक्तीचे गाडीसोबतचे छायाचित्रही सोशल मीडियावर आढळले आहे. वाझे हि काळ्या रंगाची मर्सिडीज वापरत होते. या कारमधून पाच लाखांपेक्षा जास्त रोकड, नोटा मोजण्याचे यंत्र, काही कपडे आणि स्कॉर्पिओच्या नोंदणी क्रमांक पाट्या आदी हस्तगत करण्यात आले. सध्या या कारच्या मालकाचा शोध घेण्यात येईल आहे. तसेच सीसीटीव्ही चित्रीकरणात पीपीई किटमधील व्यक्ती कोण याचाही तपास सुरु असल्याचे एनआयच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.