Sachin Vaze : हप्ता वसुलीची रक्कम सांभाळण्याची जबाबदारी ‘त्या’ महिलेकडे, वाझेचा हिस्सा आखाती देशात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हॉटेल ट्रायडंट मध्ये वास्तव्यास असताना त्याला भेटण्यासाठी एक महिला वांरवार येत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले होते. तिला ताब्यात घेण्यात एनआयएच्या तपास पथकाला यश मिळाले आहे. मीना जॉर्ज असे या महिलेचे नाव असून तिच्याकडे केलेल्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सचिन वाझेकडे दरमहा वसुलीतून जमा होणारी लााखोंची रक्कम सांभाळण्याचे काम मीना करत होती. त्यातील वाझेच्या हिश्श्यातील काही रक्कम आखाती देशामध्ये हवाल्याच्या माध्यमातून पाठवल्याची शक्यता तपासी अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

मीरा रोडच्या सेवन इलेव्हन कॉम्प्लेक्समध्ये सी विंगमधील रूम नंबर ४०१ मध्ये राहणाऱ्या मीना जॉर्जला अटक करण्यात एनआयएला यश मिळाले आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून तपास यंत्रणेला पडलेल्या प्रश्नांची उकल होणार आहे. मूळची गुजरातची असलेली मीना जॉर्ज परतल्याचे समजातच तिला ताब्यात घेण्यात आले असून तिच्याकडे चौकशी सुरु केली आहे. एनआयएच्या पथकाने मीनाकडे १३ तास चौकशी केल्यानंतर तिला मुंबईतील कार्यालयात आणून सोडले. त्यानंतर पुन्हा शनिवारी तिला चौकशीसाठी बोलावले होते. मुंबईतील विविध बार, लॉजेस पार्लर तसेच अन्य ठिकाणाहून हप्ता वसुलीतील वाझेचा वाटा हातळण्याचे काम मीना करत होती. मीनाने वाझेच्या सांगण्यावरूनच आखाती देशामध्ये गुंणतवूणकीसाठी हवाल्यामाध्यमातून काही रक्कम पाठवल्याचे तपासात समोर आले आहे. चौकशीतून अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी समोर येत आहे. आता अंबानी निवासस्थनाबाहेरी स्फोटके असेलेली कार प्रकरण, तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणात मीनाचा सहभाग होता की नाही त्या अनुषंगाने तपास सुरु आहे.

वाझेच्या वापरातील आठवी कार जप्त
मुंबई : सचिन वाझे महागड्या कार असल्याचे तपासात समोर आले आहे. शनिवारी एनआयएच्या पथकाने वाझे वापरत असलेली आठवी महागडी मर्सिडीज कार जप्त केली आहे. यापूर्वी सात कार जप्त केल्या आहेत. वाझेकडे असलेल्या अनेक कारची मालकी दुसऱ्याच्या नावावर आहे. सोयीनुसार तो त्याचा वापर करत असल्याचेही तपासात समोर आले आहे. एनआयएने ३ मर्सिडीज, २ इनोव्हा, स्काॅर्पिओ, आऊट लँडर अशा एकूण सात गाड्या जप्त केल्या. मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट ज्या गाडीत रचण्यात आला होता ती ऑडी कार अद्यापही तपास यंत्रणेला मिळाली नाही तिचा शोध सुरुच आहे. ३ मार्चला ऑडी कारमधून वाझे आणि विनायक शिंदे प्रवास करीत असल्याचे फुटेज वरळी सी-लिंक येथील टोल नाक्यावर मिळाले होते.

एनआयए कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ
एनआयएच्या विशेष न्यायालयाने वाझेच्या एनआयए कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. स्फोटक प्रकरण आणि हिरेन हत्या प्रकरणात वाझे आरोपी आहे. केवळ हे दोनच गुन्हे नाही तर त्याच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. राज्यात गाजत असलेले वसुली प्रकरणातही वाझेचा हात असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. त्यामुळे त्याच्याकडे चौकशी करायची आहे, असे एनआयएने सांगितले. वाझेला आवश्यक ते सर्व वैद्यकीय सहाय पुरविण्याचे तसेच त्याच्या प्रकृती संबंधी अहवाल ७ एप्रिलपर्यंत सादर करण्याचे निर्देश विशेष न्यायालयाने एनआयएला दिले.