नीरा : इच्छाशक्तीच्या जोरावर प्रतिष्ठाणने चांगले विद्यार्थी घडवावेत : श्रीमंतराव भोसले

नीरा : पोलिसनामा ऑनलाईन – भारतात अनेक दिग्गजांनी शैक्षणिक क्षेत्रात कार्य करून देखील देश जर्मनी, फ्रांस , इंग्लंड या देशांसारखा गतिमान झाला नाही. देश गतिमान होण्याकरिता प्रत्येकामध्ये इच्छाशक्ती असणे महत्वाचे आहे. जनतेशी समरस होऊन
इच्छा शक्तीच्या जोरावर प्रतिष्ठाणने चांगले विद्यार्थी घडवावेत असा सल्ला महात्मा गांधी विद्यालयाचे माजी प्राचार्य श्रीमंतराव भोसले यांनी दिला.

नीरा (ता. पुरंदर) येथे सन १९७८ सालच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शालेय गरजू, होतकरू व गरीब विद्यार्थांंना व विद्यालयाला मदत करण्याच्या हेतूने प्राचार्य श्रीमंतराव भोसले प्रतिष्ठाणची स्थापणा केली. प्रतिष्ठाणच्या वतीने महात्मा गांधी विद्यालयाच्या मेन गेटची उभारणी करण्यात आली. त्याचा लोकार्पण सोहळा मंगळवारी (दि.२६) प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर माजी प्राचार्य श्रीमंतराव भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी लक्ष्मणराव चव्हाण, रमणिकलाल कोठडिया, महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य गोरख थिटे , लि.रि.शहा कन्याशाळेच्या प्राचार्या सुरेखा बोडरे, रेणुका कोठडिया, साखर सहसंचालक डॉ. संजयकुमार भोसले, दत्ताजीराव चव्हाण, अनिल टकले, अ‍ॅड.आदेश गिरमे, अनिल चव्हाण, हनुमंत गायकवाड, राजेश चव्हाण, नाना जोशी, गुरूलिंग गारूळे, बाळासाहेब भोसले, शिवाजी वळकुंदे, शांतिकुमार कोठडिया, मालती नौकुडकर यांच्यासह माजी विद्यार्थी , रयत संकुलातील शिक्षक उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना भोसले पुढे म्हणाले कि, कर्मवीर आण्णांनी ‘रयत’ मध्ये चांगले विद्यार्थी घडविले. तसे गरीब कुटुंबातील शालेय विद्यार्थ्यांना शालेय पोशाख, शालेय साहित्य , फी, तसेच स्पर्धा परिक्षेसाठी मार्गदर्शन यासारखे उपक्रम राबवून प्रतिष्ठाणने भविष्यात चांगले विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्नशील रहावे. शैक्षणिक कार्य करण्याची
इतरांनाही प्रेरणा मिळेल असे कार्य प्रतिष्ठानने करावे असा मौलिक सल्ला त्यांनी दिला.

या प्रसंगी रमणिकलाल कोठडिया, दत्ताजीराव चव्हाण, प्राचार्य गोरख थिटे, शांतिकुमार कोठडिया, रमेश भिजेकर आदींनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. अनिलराजे निंबाळकर यांनी केले. स्वागत प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विलास यादव यांनी केले. तर आभार निलिमा दाभाडे यांनी मानले.