नितीश कुमार सरकार पदवीधर मुलींना देणार प्रत्येकी 50 हजार

पाटणाः पोलीसनामा ऑनलाईन – बिहार विधानसभा निवडणुकीत जदयुचे नेते नितीशकुमार यांनी आपण पुन्हा सत्तेत आल्यास राज्यातील पदवीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. आता दिलेल्या आश्वासनाला जागत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लवकरच मोठी घोषणा करण्याची तयारी केल्याचे समजते.

मुख्यमंत्री पदवीधर विद्यार्थिनी प्रोत्साहन योजनेअंतर्गत राज्यातील लाभार्थी मुलींच्या बँक खात्यात प्रत्येकी 50 हजार रुपये जमा करण्यासाठीचा प्रस्ताव बिहारच्या शिक्षण विभागाने तयार केला आहे. लवकरच हा प्रस्ताव अर्थ विभागाकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर कॅबिनेटची मंजुरी घेतली जाईल. विशेष म्हणजे, यावेळी मागच्या वेळेपेक्षा 100 कोटींहून अधिक रक्कम यावेळी दिली जाणार आहे.

300 कोटी रुपयांची तरतूद
राज्य सरकारच्या मान्यता प्राप्त महाविद्यालयांमधील पदवीधर विद्यार्थिनींच्या प्रोत्साहनासाठी रोख रकमेच्या स्वरुपात मदत केली जाते. 2019-20 या वर्षात या योजनेसाठी शिक्षण विभागाकडून 200 कोटीची रुपयांची तरतूद केली होती. यावेळी 2021 या वर्षात त्यात 100 कोटीची वाढ करून एकूण 300 कोटींची तरतूद केली जाणार आहे.

1.50 लाख पदवीधर विद्यार्थिनींना होणार लाभ
उच्च शिक्षण संचालनालयातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री पदवीधर विद्यार्थिनी पदवीधर योजनेतील यंदाच्या वाढीव मदतीमुळे याचा राज्यातील जवळपास 1.50 लाख विद्यार्थिंनींना फायदा होणार आहे. याआधी पदवीधर विद्यार्थिंनीना 25 हजाराच्या मदतीची तरतूद होती. गेल्या वर्षी एकूण 1.40 लाख विद्यार्थिंनींचे यासाठी अर्ज आले होते.