कोरोना इफेक्ट : प्रजासत्ताक दिनी यावेळी कुणीही प्रमुख पाहुणे नाहीत, 1966 च्यानंतर पहिल्यांदाच

नवी दिल्ली : यावेळी प्रजासत्ताक दिनी (republic day ) कोणत्याही देशांचे राष्ट्रप्रमुख मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती राहणार नाहीत. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी वक्तव्य जारी करत म्हटले की, कोरोनामुळे यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाला (republic day ) प्रमुख पाहुणे म्हणून कोणत्याही परदेशी राष्ट्र प्रमुखांना किंवा सरकारच्या प्रतिनिधींना आमंत्रित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी 1966 मध्ये असे झाले होते, जेव्हा प्रजासत्ताक दिन कोणत्याही प्रमुख पाहुण्यांशिवाय साजरा करण्यात आला होता.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यावर्षी प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते. नंतर त्यांनी आपला भारत दौरा रद्द केला. बोरिस जॉन्सन यांनी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे भारत दौरा रद्द केला. जॉन्सन यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली आणि भारतात येऊ न शकल्याबद्दल खेद व्यक्त केला. मोदींशी बोलताना बोरिस जॉन्सन म्हणाले होते की, ज्या गतीने ब्रिटनमध्ये नवा कोरोना व्हायरस पसरत आहे, ते पाहता ब्रिटनमध्ये राहणे महत्वाचे आहे.

ही चौथी अशी वेळ जेव्हा भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळ्याला कुणीही चीफ गेस्ट नाहीत. यापूर्वी 1952, 1953 आणि 1966 मध्ये असे झाले आहे. तर, अनेकदा असेही झाले जेव्हा देशाच्या प्रजासत्ताक दिनी दोन-दोन पाहुणे सहभागी झाले. 1956, 1968 आणि 1974 मध्ये दोन-दोन प्रमुख पाहुणे सहभागी झाले होते. तर, 2018 मध्ये 10 आशियाई देशांचे प्रमुख गेस्ट म्हणून सोहळ्यात सहभागी झाले होते. ही पहिलीच वेळ होती जेव्हा इतक्या देशांचे प्रमुख 26 जानेवारीच्या परेडमध्ये सहभागी झाले होते.

कोरोना प्रोटोकॉल सोबत साजरा होणार प्रजासत्ताक दिन
कोरोना संसर्ग पाहता 26 जानेवारीला कार्यक्रम साधेपणाने आणि कोरोना प्रोटोकॉलसह साजरा केला जाईल. कोरोनाचा नवा स्ट्रेन भारतात सुद्धा चिंता वाढवत आहे. ब्रिटनमध्ये स्थिती खुप गंभीर आहे. रोज संसर्गाचे आकडे आणि मृत्यू वाढत आहेत. याच कारणामुळे व्हॅक्सीनेशन सुरू होऊनही ब्रिटनमध्ये तिसर्‍यांदा लॉकडाऊन करावे लागले आहे.