पुण्यात शनिवारी ‘नो हाँकींग डे’ उपक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – साधारणत: दररोज एक कोटी पेक्षा जास्त वेळा हॉर्न वाजवला जातो व यातील 90 टक्के हॉर्न हे अनावश्यक असतात. बहुतांशी पुणेकर हे दिवसाला दीड ते दोन तास ट्रॅफिक मध्ये असतात आणि या अनावश्यक हॉर्नमुळे त्यांना बर्‍याचशा दुष्परिणामांना सामारे जावे लागते, त्यामुळे नो हॉर्न या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी दिनांक 12 डिसेंबर रोजी ‘नो हाँकीग डे’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबत लाईफ सेव्हिंग फाऊंडेशन, नवचैतन्य हास्ययोग परिवार आणि पुणे पोलीस (वाहतूक विभाग) यांच्या वतीने हा उपक्रम राबविला जाणार आहे. याबाबतची माहिती फाऊंडेशनचे देवेंद्र पाठक, हास्ययोग परिवाराचे मकरंद टिल्लू आणि प्रा.पद्माकर पुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या उपक्रमांतर्गत शनिवारी (दि. 12) दुपारी 12 वाजता प्रातिनिधीक स्वरुपात टिळक चौक (अलका टॉकीज चौक) येथे जनजागृतीपर कार्यक्रम होणार आहे. तर, कोरोना साथीमुळे मुख्य कार्यक्रम यंदा ऑनलाईन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर हे असून प्रमुख पाहुणे पुणे पोलीस वाहतूक विभागाचे उपायुक्त राहुल श्रीरामे, वरिष्ठ क्रीडा समालोचक सुनंदन लेले, एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू, डॉ.राजेश देशपांड, साई पॅकेजिंगचे शंतनु प्रभुणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे.

शाळा, हॉस्पिटल अशा ठिकाणी नो हॉर्न विषयी जनजागृती करणारे फलक असतात. पण आपण त्यांना विशेष गांभीर्याने घेत नाही. त्याची आठवण पुणेकरांना करून देण्यासाठी आणि या समस्येला गांभीर्याने घेण्याचे आवाहन करण्यासाठी 12 डिसेंबर हा नो हाँकींग डे पाळण्याचे आवाहन संस्था करीत आहेत. तसेच पुण्यातल्या विविध आय टी कंपनी, हॉटेल्स, मॉल्स, पीएमपी बसेस, विविध सामाजिक संघटना, सोसायटी या सर्वांनाच उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही टिल्‍लू यांनी यावेळी केले.